yuva MAharashtra सांगलीच्या राजकारणात आजचा दिवस दुर्दैवी - पृथ्वीराज पाटील

सांगलीच्या राजकारणात आजचा दिवस दुर्दैवी - पृथ्वीराज पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ डिसेंबर २०२
सांगली जिल्ह्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस दुर्दैवी आहे. महायुती सरकारने सन २०१४ नंतर पुन्हा एकदा जिल्ह्याला मंत्रीपदापासून दूर ठेवले आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तरी मंत्री नसल्याने जिल्ह्याच्या विकासात बाधा येता कामा नये. त्यासाठी काँग्रेस सतत आक्रमक भूमिका घेत राहील. भाजपने जिल्ह्यावर कसला सूड उगवलाय, हे समजण्यापलिकडे आहे, अशी टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज केली.

पृथ्वीराज पाटील म्हणाले की, ‘‘राजकारण राजकारणाच्या जागी आणि सांगलीचा विकास त्याच्या जागी, ही भूमिका घेऊन आम्ही काम केले आहे. ज्या क्षणाला निकाल लागला त्या क्षणाला सामान्य लोकांच्या हितासाठी मी लागलो आहे. विकासकामासाठी सत्ताधाऱ्यांना साथ देणे आणि जे चुकते तेथे पाय रोवून विरोध करणे, हीच भूमिका काँग्रेसने सतत बजावली आहे. भाजप, महायुतीचे नेतृत्व मात्र सांगलीच्या एकूण राजकारणाला दुय्यम लेखताना दिसत आहे.


वसंतदादा, राजारामबापू ते दिवंगत पतंगराव कदम, दिवंगत आर. आर. पाटील, दिवंगत मदनभाऊ तसेच जयंत पाटील, विश्वजीत कदम, अण्णासाहेब डांगे, अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक असे एकापेक्षा एक मंत्री या जिल्ह्याने दिले. महायुतीला बहुदा त्या क्षमतेचे नेतृत्व सांगलीत दिसत नसावे. सन २०१४ ला युतीचे पाच आमदार असताना मंत्रीपदाचा दुष्काळ होता. तेच आता घडले आहे. उसन्या पालकमंत्र्यांवर कारभार होणार कसा? आमचे या सत्तेवर लक्ष असेल. महासत्तेच्या जोरावर महायुतीला आम्ही सांगलीची फरफट करू देणार नाही.’’