| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० डिसेंबर २०२४
जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक या सर्व घटकांनी नवभारत साक्षरता कार्यक्रमामध्ये जोमाने काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
मिरज हायस्कूल मिरज येथे शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय उल्लास मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी डाएट चे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी (योजना) महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) विशाल दशवंत, उपशिक्षणाधिकारी (योजना) गंगाधर गिरी, मिरज हायस्कूल मिरजचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी यावेळी मागील वर्षी नवसाक्षर झालेल्या व या वर्षी नवसाक्षर होत असलेल्या व्यक्तींचे, स्वयंसेवकाचे अभिनंदन केले. व केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी व प्रचार प्रसार करण्यासाठी विविध स्तरावर मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रभावीपणे प्रचार व प्रसार करण्यासाठी केंद्रीयस्तरावर उल्लास मेळावा डिसेंबर २०२३ मध्ये दिल्ली येथे संपन्न झाला.
त्याच अनुषगांने सप्टेंबर २०२४ मध्ये राज्यस्तरीय मेळावा पुणे येथे संपन्न झाला. तसेच दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी कोल्हापूर विभागस्तरीय मेळावा पेठ वडगांव येथे संपन्न झाला. त्याच धर्तीवर जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व बीटस्तरीय उल्लास मेळाव्याचे आयोजन करणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी प्रथम स्टॉल प्रदर्शनचे उद्घाटन झाले. जिल्ह्यातील १० तालुके व महानगरपालिका यांनी विविध विषयावर आधारित शैक्षणिक साहित्य बनवून स्टॉल प्रदर्शनात ठेवले होते. त्यामध्ये आर्थिक साक्षरता, माता व बालकांचे संगोपन निगा, असाक्षरांना साक्षर करण्याचे विविध मार्ग, आपत्ती व्यवस्थापन, विविध व्यवसायासाठी कौशल्य विकास, अशा विविध विषयावर आधारित भितीपत्रके, चार्ट, खेळातून मनोरंजन, ई लर्निंग साहित्य, अशा विविध बाबी स्टॉल मध्ये उत्कृष्ट रित्या सादर करण्यात आल्या. पारंपारिक व आधुनिक खेळ या विषयावरील साहित्य पाहणीच्या दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी विटी-दांडू, गोट्या, तिरंदाजी व नेमबाजी या खेळाचा स्वतः आनंद लुटला व याबद्दल विशेष अभिनंदन केले. स्वागतपर प्रस्तावनामध्ये मिरज हायस्कूल मिरजचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे नवभारत साक्षरता कार्यक्रम (४). यांनी हायस्कूलच्या १६१ वर्षाच्या इतिहासा विषयी सादरीकरण केले. प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी (योजना) महेश धोत्रे यांनी सन २०२७ पूर्वीच सांगली जिल्हा १०० टक्के साक्षर करण्याचे उद्दिष्ट गाठण्याची ग्वाही सर्वांच्या वतीने दिली. आटपाडी गटशिक्षणाधिकारी जगन्नाथ कोळपे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी मनपा, सर्व नवभारत साक्षरता विषय प्रमुख, नवसाक्षर व त्यांना शिकविणारे स्वयंसेवक व शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.