| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ डिसेंबर २०२४
25 वर्षाची राजकीय मैत्री एका झटक्यात तोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. एका बाजूला महाआघाडीत तिन्ही पक्षांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीच्या मंत्रिमंडळात डावलल्याने मित्र पक्षातील अनेक आमदार नाराज आहेत.
या पार्श्वभूमीवर ठाकरे-फडणवीस भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नागपुरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस पार पडला. ही भेट अवघी पंधरा मिनिटांची असली तरी, पाच वर्षाचा अबोला या पंधरा मिनिटात दूर झाला का ? या भेटीने नवी राजकीय समीकरणे का ? तसेच यातून नाराज आमदारांना काही संदेश द्यायचा आहे का ? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळातून निर्माण होत आहेत.
उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाचे स्वप्न अपुरे राहिले. आता किमान विरोधी पक्षनेते पद तरी आपल्या पदरात पडते का ? याबाबतही ही भेट असू शकते असा एक मतप्रवाह राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्यामुळे फडणवीस किंवा ठाकरे या दोघांकडून काही मत व्यक्त होत नाही, तोपर्यंत या भेटीबद्दलची उत्सुकता कायम राहणार आहे.