| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ डिसेंबर २०२४
विधानसभा निवडणुकीत अनेकांनी बंडखोरी करत उमेदवारी केली होती. अशाच प्रकारे सांगलीत काँग्रेस नेत्या जयश्री मदन पाटील यांनी देखील बंडखोरी करत निवडणूक लढविली. मात्र त्यांचा पराभव झाला. यानंतर त्या मोठा निर्णय घेणार अशी चर्चा रंगली होती. परंतु आज त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ इतकेच वक्तव्य करत पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे.
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत जयश्री पाटील यांनी उमेदवारी केली होती. दरम्यान सांगली विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर जयश्री मदन पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्या बाबतच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तसेच जयश्री पाटील या २ डिसेंबर स्व. मदन पाटील यांच्या जयंती दिवशी मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. त्यामुळे जयश्री मदन पाटील या आज मोठा निर्णय जाहीर करतील अशी सर्वांना अपेक्षा होती.
दरम्यान स्व. मदन पाटील यांच्या जयंती कार्यक्रमाच्या वेळी जयश्री पाटील यांनी कोणताही निर्णय न घेता योग्य वेळी 'योग्य निर्णय घेऊ !' अशी भूमिका जाहीर केली. जयश्री मदन पाटील यांच्या या भूमिकेमुळे मात्र कार्यकर्ते निराश झाले आहेत. पण राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जयश्री पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ माजली आहे.
आज कोणताही निर्णय न घेतल्याने जयश्री मदन पाटील या कोणत्या वेळी कोणता निर्णय जाहीर करतील. याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे. त्यांची योग्य वेळी निर्णय जाहीर करण्याची ती वेळ कोणती ? असा सवालही कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. मात्र या सर्व प्रकारामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ माजवली आहे.
लवकरच जिल्हा परिषद व सांगली महापालिकेचे निवडणूक जाहीर होणार आहे. काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आल्याने या निवडणुकीत जयश्रीताईंना अद्याप काँग्रेसमध्ये असलेल्या, आणि काँग्रेसतर्फे लढू इच्छिणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना उघड बळ देणे अवघड होणार असल्याचे बोलले जात आहे. जयश्रीताईंचा प्रचार केलेल्या इच्छुक उमेदवारांना काँग्रेसकडून उमेदवारी नाकारली जाऊ शकते. अशा वेळी पुन्हा "सांगली पॅटर्न" राबवला जाणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.