| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २१ डिसेंबर २०२४
पुलंचं लिखाण म्हणजे अनेकांसाठी एक उर्जास्त्रोत. मिश्किल टीप्पणी करणं असो किंवा एखाद्या मुद्द्यावर, एखाद्या पात्रावर केलेलं भावनिक लिखाण असो. पुलं देशपांडे यांनी कायमच त्यांच्या लेखणीतून अशी काही कमाल केली, की कैक दशकांपासून त्यांच्या या साहित्यानं वाचकांना, पुस्तकप्रेमींना आणि श्रोत्यांना तृप्त केलं आहे. अशा या पुलंनी चक्क भगवान श्रीकृष्णाचाही बायोजेटा लिहिला होता बरं! ऐकून तुम्हीही थक्क व्हाल पण, हे खरंय.
नक्षत्रांचं देणं या कार्यक्रमादरम्यान, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी पुलंचे हे शब्द कार्यक्रमातील उपस्थितांपुढे सादर केले आणि हाच व्हिडीओ झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला होता. पुलंच्या लेखणीतून उतरलेला हा श्रीकृष्णाचा बायोडेटा, त्याचं जन्मस्थळ यामध्ये नेमकं काय लिहिण्यात आलंय हे पाहाच....
पुलं लिहितात,
'यादव श्रीकृष्ण वासुदेव
जन्म- मथुरा
बालपण- पहिल्या दिवसापासून गोकुळात, बालपणी मुरलीवादक म्हणून प्रसिद्धी.
शिक्षण- डेअरी फार्मिंगचे प्राथमिक शिक्षण, पुढे सांदिपनी विद्यालयातून एसएससी. त्यानंतर राजकारणात प्रवेश. कंस, चाणूर इत्यादींचा पराभव.
भारतीय युद्धात प्रथम मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्समधून पांडवांतर्फे कौरवांकडे अॅम्बेसेडर. तिथे वाटाघाटी फिस्कटल्यानंतर प्रत्यक्ष आर्मी जॉईन केली.
ट्रान्सपोर्ट खात्यात सारथ्याच्या हुद्द्यावर नेमणूक.
ग्रंथरचना- भगवद् गीताहा अर्जुनाच्या सहाय्याने रचलेला संवादात्मक कवितासंग्रह.'
नोकरीसाठी सहसा ज्याप्रमाणं व्यक्ती परिचय म्हणून काही प्राथमिक माहिती दिली जाते, अगदी तशीच माहिती पुलंनी त्यांच्या शैलीत चक्क श्रीकृष्णाविषयी लिहिली. हे झालं एक उदाहरण. पण, पुलं देशपांडे यांनी आतापर्यंत त्यांच्या विविध शैलीतील लेखनातून अनेक पात्र जीवंत उभी केली. ही पात्र आजही अनेकांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग असून, त्यांचा विसर कोणालाही पडलेला नाही. मग तो अंतू बरवा असो किंवा नामू परीट असो... इतकंच काय तर व्यक्तीच नव्हे, तर पुलंनी केलेली प्रवासवर्णनंही तितकीच बोलकी असतात...