yuva MAharashtra राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मिरजेतील शिवाजी रस्त्याचे पथदिवे त्वरित बसवणार, जानेवारी अखेर दुभाजकही पूर्ण करणार !

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मिरजेतील शिवाजी रस्त्याचे पथदिवे त्वरित बसवणार, जानेवारी अखेर दुभाजकही पूर्ण करणार !


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. ७ डिसेंबर २०२
मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या मध्यभागी पथदिवे आणि दुभाजक करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. पथदिवे बसविण्यास शनिवारपासून सुरू होणार आहे. तर, जानेवारी अखेरपर्यंत रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकाचे कामही पुर्ण होणार आहे.  

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मध्यभागी दुभाजक आणि पथदिवे बसविण्याची मागणी मिरज सुधार समितीने लावून धरली आहे. पथदिवेसाठी केलेल्या सिमेंट कट्ट्यांना धडकून दररोज अपघात घडत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीबाबत शहरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. म्हणून 15 डिसेंबर पर्यंत रस्त्यावर दुभाजक आणि पथदिवे न बसविल्यास मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयात प्रकल्प संचालक वसंत पंढरकर, चंद्रकांत भरडे, ठेकेदार अरुण पाटील यांच्यासमवेत मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, शंकर परदेशी, जहिर मुजावर, नरेश सातपुते, राजेंद्र झेंडे यांची बैठक झाली.


या बैठकीत पथदिवे तात्काळ बसविण्याची मागणी मिरज सुधार समितीने लावून धरल्यानंतर शनिवारपासून रस्त्यावर पथदिवे बसविण्यास सुरुवात करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, जानेवारी अखेर दुभाजकाचे कामही पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

"अधिकाऱ्यांना फोन लावा" उपक्रमाची धास्ती...

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने मिरज सुधार समितीने महामार्गाच्या अधिकाऱ्यांचे फोन क्रमांक सार्वजनिक करून "अधिकाऱ्यांना फोन लावा" उपक्रम राबविला.. दररोज छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबाबत शेकडो फोन अधिकाऱ्यांना गेल्याने अधिकारी सुध्दा वैतागून शेवटी रस्त्यावर पथदिवे आणि दुभाजकाला मंजुरी दिली.