yuva MAharashtra सांगलीला प्रगतिशील शहर बनवणार, खासदार विशाल पाटील : हॅबिटॅट प्रदर्शनाचा समारोप !

सांगलीला प्रगतिशील शहर बनवणार, खासदार विशाल पाटील : हॅबिटॅट प्रदर्शनाचा समारोप !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ डिसेंबर २०२
सांगलीच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून जे काही लागणार आहे ते मला सांगा. लोकप्रतिनिधी म्हणून सांगलीला प्रगतिशील शहर बनवण्याची जबाबदारी माझी आहे, असे प्रतिपादन खासदार विशाल पाटील यांनी केले. नेमिनाथ नगरमधील कल्पद्रुम मैदानावर इंजिनिअर्स अँड आर्किटेक्टस् असोसिएशनतर्फे आयोजित 'हॅबिटेट २०२४' या बांधकाम आणि वास्तुविषयक साहित्याशी निगडित प्रदर्शनाचा समारोप आज झाला. यावेळी खासदार विशाल पाटील बोलत होते. यावेळी प्रदर्शनाचे कन्व्हेनर प्रमोद शिंदे, असोसिएशनचे अध्यक्ष केदार टाकवेकर, ट्रस्टी चेअरमन व्ही. एल. मेहता, प्रमोद चौगुले, सचिव प्रमोद पाटील मजलेकर, निखिल शहा व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले, सांगलीत सगळ्या क्षेत्रात चांगले टॅलेन्ट आहे. कन्स्ट्रक्शन, आर्किटेक्चर, डिझाईनिंग क्षेत्रात देश विदेशात कौतुक होईल इतकं चांगलं टॅलेंट आपल्याकडे आहे. वसंतदादांच्या काळापासून सांगलीची शेती आणि औद्योगिक प्रगती होत गेली आहे. त्यामुळे सांगलीत आज बाजूच्या राज्यातून लोक कामाच्या निमित्ताने येतात आणि राहतात. घरे बांधतात. अशावेळी त्यांना देश-विदेशात काय ट्रेड चालू आहे. ते आपल्याला उपलब्ध व्हावे यासाठी हॅबिटॅट प्रदर्शन एक चांगले माध्यम आहे. या माध्यमातून उत्पादक, वितरक आणि ग्राहक या सर्वांनाच एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम हॅबिटॅटने केले आहे आणि यात संयोजक यशस्वी झाले आहेत. गेले चार दिवसात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या प्रदर्शनास भेट दिली आहे. यातून सांगली प्रगती करताना दिसते आहे.


असोसिएशनचे अध्यक्ष केदार टाकवेकर यांनी प्रास्ताविक केले. हॅबीटेंटचे कन्व्हेनर प्रमोद शिंदे यांनी प्रदर्शनाची माहिती दिली. या प्रदर्शनास विविध कंपन्यानी सहकार्य केले. तसेच सांगलीकरांनीही गेल्या चार दिवसात मोठा प्रतिसाद दिल्याचे सांगिले. यावेळी शिंदे यांनी एक्झिबिशन सेंटर उभारण्यात यावे, त्यामुळे विविध प्रदर्शनांना एक कायमस्वरूपी केंद्र मिळेल अशी मागणी खासदार विशाल पाटील यांच्याकडे केली. खासदार पाटील यांनी त्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

याप्रदर्शनात सिंपोलो कंपनीचा स्टॉल उत्कृष्ट ठरला. तर बिबा कंपनीच्या स्टॉलची संकल्पना उत्कृष्ट ठरली. अविषाचा स्टॉल प्रेक्षकांचे सर्वाधिक आकर्षण ठरला. यश पॉली कंपनीच्या स्टॉलचे डिझाईन उत्कृष्ट ठरले तर ग्रीनलॅम कंपनीचा स्टॉल उत्कृष्ट नाविन्यपूर्ण ठरला या सर्व स्टॉलसह बिडकर स्वीसप्लाय स्टॉलचा सत्कार करण्यात आला.

आशिष चिंचवाडे यांनी आभार मानले तर सुस्मित टाकवेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मुकुल परिख, प्रशांत पाटील मजलेकर, एस पी तायवडे पाटील, शितल शहा, भावेश शहा, रणदीप मोरे, पंजाब मोरे, जितेंद्र कोळसे आदी उपस्थित होते.