| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १ डिसेंबर २०२४
विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएम घोटाळा झाल्याचे आरोप केले आहेत. इतकचं नाही तर महाराष्ट्रातील २२ पेक्षा जास्त उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. ईव्हीएममुळे पराभव झाला हे सिद्ध करा. तसेच ईव्हीएम घोटाळा झाल्याचे सिद्ध करून दाखवा असे आव्हानच अजित पवार यांनी विरोधकांना दिले आहे.
अजित पवारांचे विरोधकांना चॅलेंज !
बाबा आढाव यांचे ईव्हीएम विरोधात पुणे येथे आत्मक्लेश आंदोलन सुरू होते. त्यांच्या आंदोलनाला अजित पवार यांनी भेट दिली. यावेळी अजित पवारांनी विरोधकांकडून पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले जात असल्याचा आरोप केला जात आहे. ईव्हीएम घोटाळा झाल्याचे सिद्ध करुन दाखवावं असं खुलं चॅलेंज अजित पवारांनी विरोधकांना दिले.
आपलं मत मांडण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्यानुसार बाबा आंदोलन करत आहेत. बाबांनी काही गोष्टी सांगितल्या. त्यातील काही गोष्टी निवडणूक आयोग, कोर्ट यांच्याशी संबंधित आहेत. लोकसभा निवडणूक झाली तेव्हा मविआच्या ३१ जागा आल्या. आमच्या १७ जागा आल्या. त्यावेळी कोणी काही म्हणाले नाही. बारामतीत माझ्या उमेदवार पराभूत झाल्या. जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार ? जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, निवडणूक आयोगाने काँग्रेसला चर्चेचे निमंत्रण दिले असून ३ डिसेंबरला दिल्लीत चर्चेला येण्याचं निमंत्रण देण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप काँग्रेसने असून, त्यामुळे काँग्रेसच्या शंका निरसन करण्याचे आश्वासन निवडणूक आयोगाने दिले आहे. आता काँग्रेस या निमंत्रणाचा स्वीकार करून निवडणूक आयोग कार्यालयात जाणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.