yuva MAharashtra कर्जदारांचे प्रस्ताव नाहक आडवू नका जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी पिळले बँक अधिकाऱ्यांचे कान !

कर्जदारांचे प्रस्ताव नाहक आडवू नका जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी पिळले बँक अधिकाऱ्यांचे कान !

            फोटो सौजन्य  - दै. ललकार

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० डिसेंबर २०२
शेतकऱ्यांसह अन्य शासकीय योजना अंतर्गत कर्जांचे प्रस्ताव विविध बँकांमध्ये दाखल होत असतात. हा प्रस्ताव स्वीकारताना नागरिकांना जे अनुभव येतात, त्याची प्रचिती सर्वांनाच असते. याबाबत अनेक कर्जदार घायकुतीला आलेलेही अनेकांनी अनुभवलेले आहे. जिल्हा प्रमुख म्हणून डॉ. राजा दयानिधी यांनाही याची जाणीव असल्याने, त्यांनी जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत, शेतकऱ्यांच्या पीक कर्जासह अन्य शासकीय योजनांचे कर्ज प्रस्ताव प्राधान्याने व सकारात्मक दृष्टिकोनातून मंजूर करावेत, नाहक कोणाचे प्रस्ताव अडवू नयेत, अशा स्पष्ट सूचना देऊन बँक अधिकाऱ्यांचे कान पिळले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक संजीवकुमार सिंग, रिझर्व बँक ऑफ इंडिया मुंबईचे विश्वजीत दास, अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे आदि प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले की सर्व बँकांनी दैनंदिन सेवा देताना सौजन्याची भूमिका घ्यायला हवी. पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, राष्ट्रीय पशुधन विकास योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, पीक कर्ज सह विविध महामंडळाकडे लाभार्थींचे कर्ज प्रस्ताव सत्वर मंजूर करण्याचे आदेश देऊन शैक्षणिक कर्ज प्रस्तावही बँकांनी वेळेत निकाली काढावेत यामध्ये दिरंगाई करू नये, त्रुटी असतील तर अर्जदारास सहकार्य करून त्याची पूर्तता करून द्यावी व कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे असे आव्हान केले. 

यावेळी पीक कर्ज वितरणासह कृषी व तत्सम क्षेत्र, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगासह अन्य प्राथमिक व अप प्राथमिक क्षेत्राकरिता विभागवार बँक निहाय उद्दिष्टे व त्यांची पूर्तता याबाबत धावा घेण्यात आला. तसेच विविध महामंडळांकडे कर्ज योजना व केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे उद्दिष्टे व कर्ज वितरण आदि बाबतही चर्चा करण्यात आली.