yuva MAharashtra पराभवाच्या राखेतून पृथ्वीराज पाटील यांची फिनिक्स प्रमाणे गगन भरारी, जनतेच्या प्रश्नासाठी पुन्हा एल्गार !

पराभवाच्या राखेतून पृथ्वीराज पाटील यांची फिनिक्स प्रमाणे गगन भरारी, जनतेच्या प्रश्नासाठी पुन्हा एल्गार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० डिसेंबर २०२
गेली दहा वर्षे जनतेच्या प्रश्नासाठी सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले. महा आघाडीच्या माध्यमातून त्यांनी सांगलीच्या विकासासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला. एकदा नव्हे तर दोनदा विधानसभेच्या रणांगणात बलाढ्य उमेदवार विरोधात त्यांनी आव्हान उभे केले. परंतु घरभेद्यांच्या राजकारणामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र खचून न जाता पराभवाच्या राखेतून त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे गगन भरारी घेतली आहे.

पृथ्वीराज पाटील यांनी काल सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे, सांगलीच्या आरोग्याचा कर्दनकाळ ठरलेल्या शेरीनाला प्रश्नी निवेदन दिले असून, शेरीनाला प्रस्तावावर प्रशासकीय पातळीवरूनच पाठपुरावा करावा अशी आग्रही मागणी केली आहे. गेल्या चार दशकांपासून कृष्णा नदीच्या आणि पर्यायी सांगलीकरांच्या आरोग्याशी खेळखंडोबा करणाऱ्या शेरीनाला प्रकरणी ९३ कोटी रुपये निधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे आहे. त्याचा पाठपुरावा महापालिका प्रशासनाने स्वतः करावा. सांगलीचे आमदार हा विषय रेटू शकत नाहीत, हे दहा वर्षात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आम्ही महापालिकेलाच जबाबदार धरू, अशी आग्रही भूमिका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे मांडली.


पृथ्वीराज पाटील यांनी काल आयुक्त श्री. गुप्ता यांची भेट घेत कृष्णा नदीचे प्रदूषण, सांगलीचा पाणीपुरवठा, शेरीनाल्याचे पंप, धुळगाव योजना आणि नवीन शेरीनाला प्रस्तावावर सविस्तर चर्चा केली. आयुक्त श्री. गुप्ता यांनी महापालिकेकडून शेरीनाला सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी 93 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला असल्याचे सांगितले. श्री. पाटील यांनी या प्रस्तावाची आम्हाला कल्पना आहे, मात्र तो मंजूर व्हावा, यासाठी काय प्रयत्न होताना दिसत नाहीत, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. 

गेली दहा वर्षे या शहराचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यांना हा प्रश्न महत्वाचा वाटत नसेल तर सांगलीकरांचे दुर्दैव आहे. हा प्रश्न महापालिका प्रशासनाने हातात घ्यावा. त्यांनीच पाठपुरावा करून प्रकल्प मंजुरी करून घ्यावी. त्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. आयुक्त श्री. गुप्ता यांनी राज्यात मंत्रीमंडळ विस्तारानंतर याबाबत तातडीने हालचाली करू, असे आश्वासन दिले.

सध्या ईव्हीएम मशीनच्या प्रश्नावरून महाआघाडीने लढा उभारला आहे. सांगली येथे पृथ्वीराज पाटील यांनी या प्रश्नाचे एल्गार पुकारला असून या पुढील सर्व प्रकारच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी "ईव्हीएम हटवा - लोकशाही वाचवा स्वाक्षरी मोहीम" हाती घेतली आहे. आज मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने मित्र मंडळ चौक, मेन रोड सांगली येथे स. १० वा. सह्यांची मोहीम आयोजित केली असून, नागरिकांनी लोकशाही वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.


नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल केवल काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीसाठीच नाही तर राज्यातील जनतेसाठी धक्कादायक, अविश्वसनीय व अनाकलनीय आहेत. कोणतीही लाट नसताना लोकसभेच्या उलटे निकाल कसे काय लागू शकतात असा प्रश्न राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. विधानसभा निकालातील मतांच्या टक्केवारी तफावत गंभीर व चिंताजनक आहे. सर्व निवडणुका या मतपत्रिकेवरच घ्याव्यात यासाठी काँग्रेस पक्षातर्फे ५ लाख सहयांचे निवेदन मा.राष्ट्रपती, मा.पंतप्रधान, मा. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व मुख्य निवडणूक आयुक्त यांना अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खासदार मालिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात येणार असून ही सहयांची मोहीम ५ ते २० डिसेंबर या कालात देशात व राज्यभर राबवण्यात येणार असल्याची माहिती पृथ्वीराज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.