| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ डिसेंबर २०२४
सुट्ट्या कोणत्याही असोत किंवा सणासुदीचा कालावधी असो अशा प्रत्येक कालावधीमध्ये ज्या लोकांना पर्यटनाची आवड असते असे लोक केव्हाही पर्यटन म्हणजेच फिरण्याचा प्लान बनवत असतात व असे प्लान बऱ्याचदा कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत केले जातात. अशी फिरण्याची आवड असणारे लोक महाराष्ट्रातच नाही तर बऱ्याचदा भारतातील इतर राज्यातील पर्यटन स्थळांना देखील भेटी देतात. तसेच काही काही जण परदेशी देखील पर्यटन करतात. तसेच आता नवीन वर्षाचे आगमन काही दिवसांनी होईल. तेव्हा या नवीन वर्षाच्या स्वागताच्या सेलिब्रेशन करिता अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात व मौज मस्ती करतात.
यासाठी बऱ्याचदा महाराष्ट्राच्या बाहेर असलेल्या ठिकाणांना पसंती दिली जाते. परंतु जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये चांगले असे पर्यटन स्थळे असून अनेक ऐतिहासिक स्थळे तसेच नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेले स्थळे आपल्याला दिसून येतात. परंतु बऱ्याचदा आपल्या ते लक्षात येत नसल्याने आपण उगीचच महाराष्ट्राच्या बाहेर फिरायला जाण्याचा प्लान बनवतो. त्यामुळे तुम्हाला देखील जर या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी किंवा सेलिब्रेशनसाठी कुठे बाहेर जायचा प्लान असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याची निवड करू शकतात.
या जिल्ह्यामध्ये अनेक उत्तम अशी निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेली पर्यटन स्थळे असून अगदी कमीत कमी खर्चात तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत या ठिकाणी नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करू शकतात.
सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
1- दंडोबा हिल्स आणि फॉरेस्ट प्रिझर्व- सांगलीत जेव्हा तुम्ही याल तेव्हा हा जंगलाचा परिसर पाहण्यास कधीच विसरू नका. दंडोबा हिल्स आणि फॉरेस्ट प्रिझर्व हे जवळपास 28 किलोमीटर पर्यंत पसरलेले जंगल असून ज्यांना निसर्गाची आवड आहे अशा निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. दूरवर पसरलेली हिरवीगार वनराई आणि या ठिकाणाचे शांत असे वातावरण तुमच्या मनाला मोहून टाकते. बरेच पर्यटक या ठिकाणी वारंवार भेट देतात.
तसेच ज्यांना पक्षी व प्राण्यांविषयी प्रेम आहे असे अनेक पर्यटक या ठिकाणी वेगवेगळे पक्षी आणि प्राणी पाहण्यासाठी येतात व त्या दृष्टिकोनातून अभ्यास देखील करतात. दंडोबाचा डोंगर देखील अतिशय निसर्गाने संपन्न असून याठिकाणी ट्रेकिंगची मजा घेऊ शकतात.
2- बाहुबली हिल मंदिर- हे एक जैन स्थळ असून या ठिकाणी सांगली आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील अनेक लोक दर्शनाला येतात. कारण हे स्थळ अतिशय पवित्र असे मानले गेले असून एक प्राचीन असे स्थळ आहे. या ठिकाणी 28 फूट उंचीची संत बाहुबली यांची मूर्ती असून ही मूर्ती पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून पर्यटक या ठिकाणी येतात.
मंदिरात जाण्याकरिता तुम्हाला साधारणपणे 400 पायऱ्या चढून जावे लागते. सुंदर व निसर्गाने संपन्न असलेल्या डोंगरावर हे मंदिर असून या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची गर्दी दिसून येते. या मंदिर परिसरात असलेले शांत आणि रम्य वातावरण मनाला खूप शांतता देते.
3- सांगलीचा किल्ला- तुम्हाला जर आपल्या महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर एकदा या सांगली किल्ल्याला नक्कीच भेट द्यावी. सांगली जिल्ह्याचे एक वैभव म्हणून सांगली किल्ला ओळखला जातो. सांगली किल्ल्याचे बांधकाम 19 व्या शतकात श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन पहिले यांनी केले व हा किल्ला आकाराने गोलाकार असून या ठिकाणी सहली करिता अनेक ठिकाणचे लोक येतात.
4- सिद्धेवाडी धबधबा- सांगली जिल्ह्यातील सिद्धेवाडी धबधबा हा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून या ठिकाणी धबधबा पाहायला खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होते. याला सांगलीचा धबधबा असे देखील म्हटले जाते. या धबधब्याचे पाणी जेव्हा 50 फुटावरून खाली कोसळते तेव्हा हे दृश्य डोळ्यात साठवण्यासारखे मनमोहक असते. या धबधब्याच्या आजूबाजूला पसरलेली हिरवेगार जंगलामुळे या ठिकाणचे सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडते. या ठिकाणी पर्यटक हायकिंग तसेच ट्रेकिंगचा आनंद मोठ्या प्रमाणावर घेतात. पावसाळ्यामध्ये हा धबधबा पाहण्याची मजा काही औरच असते.