yuva MAharashtra सिंथेटिक तबल्यावर झाकीर हुसेन यांच्या बोटांची जादू ऐकण्याची संधी हुकली - विजय व्हटकर

सिंथेटिक तबल्यावर झाकीर हुसेन यांच्या बोटांची जादू ऐकण्याची संधी हुकली - विजय व्हटकर

           फोटो सौजन्य  - लोकसत्ता

| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. १८ डिसेंबर २०२
भारताला मोठी संगीत परंपरा आहे. केवळ सीमेसंगीतच नव्हे तर शास्त्रीय संगीतातील अनेक कलाकारांनी आपल्या कलागुणांनी जागतिक मोहर उमटवली आहे. यामध्ये संगीत जगतात उस्ताद झाकीर हुसेन हे सुवर्ण अक्षरांनी कोरलेले नाव... एखाद्या समारंभात त्यांनी तबल्यावर ताल धरला की, समोरील प्रेक्षक वृंद मंत्रमुग्ध होऊन जायचा. झाकिर हुसेन यांचे चाहते केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक देशात आढळून येतात.

संगीत क्षेत्रात मिरजेला अनन्य साधारण महत्त्व आहे. येथील तंतुवाद्ये जगभरात प्रसिद्ध आहेत. येथील सतार खरेदी करण्यासाठी देश विदेशातून कलाकार येत असतात. या पार्श्वभूमीवर मिरजेतील विजय व्हटकर यांनी पहिल्यांदाच सिंथेटिक तबल्याची निर्मिती केली आहे. तबला म्हटलं की झाकीर हुसेन यांचं नाव आपसूक समोर येतं. हुसेन आणि व्हटकर यांचं नातंही असंच घट्ट. हुसेन यांनी काही वर्षांपूर्वी व्हटकर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली होती. हुसेन यांच्या निधनानंतर विजय व्हटकर यांनी त्यांच्या आठवणीला उजाळा दिला. आपल्या नव्याने तयार करण्यात आलेल्या सिंथेटिक तबल्यावर उस्ताद झाकीर हुसेन यांच्या बोटांची जादू ऐकण्याची संधी हुकल्याची खंत तबला निर्माते विजय व्हटकर यांनी सोमवारी व्यक्त केली. 


यावेळी बोलताना व्हटकर म्हणाले की, २०१३ मध्ये झाकीर हुसेन हे मिरजेत आले होते. त्यावेळी व्हटकर यांच्या मातोश्री व माजी नगरसेविका सुलोचना व्हटकर यांनी त्यांचे वाढदिवसानिमित्त औक्षण केले होते. 

व्हटकर यांच्या तबलानिर्मिती केंद्राला भेट दिली होती. तबला तयार करत असताना काय खबरदारी घ्यायची, कडी, पुडी कोणती असावी, ताण कसा आणि किती काढावा लागेल याची माहिती देण्याबरोबरच शाई कशी आणि किती घोटायला हवी याची माहिती दिली होती. तबल्याला वापरण्यात येणारे लाकूड कसे हवे, त्यात पोकळी किती असावी याचीही माहिती ते देत असत, असे व्हटकर सांगतात.

विना चमड्याचा तबला तयार करण्यात आल्याचे आणि त्याचे स्वामित्व घेतल्याचे उस्ताद यांना सांगितले होते. त्यावेळी त्यांनी २ डिसेंबर दरम्यान मी पुण्यात येत आहे. त्यावेळी मला तो दाखविण्यासाठी पुण्याला या असा निरोप त्यांनी स्वत: दिला होता. त्यांना नव्याने तयार करण्यात आलेला तबला वाजवून पाहायचा होता. मात्र, तत्पूर्वीच अमेरिकेतील बोस्टन येथे कार्यक्रमास गेले असताना हॉटेलमध्ये त्यांच्या छातीत दुखू लागल्याने कार्यक्रम रहित करून सन फ्रॅन्सिस्कोमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथेच त्यांना मृत्यूने गाठले. त्यामुळे पहिल्यांदाच निर्माण केलेला सिंथेटिक तबल्यावर ताल धरण्याचे आपले स्वप्न अपुरे राहिले, अशी खंत व्हटकर यांनी व्यक्त केली.