| सांगली समाचार वृत्त |
बीड - दि. २४ डिसेंबर २०२४
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना कडक कारवाई करण्यात यावी, तसेच देशमुखांच्या कुटुंबीयांना कायमस्वरूपी संरक्षण देण्यात यावं अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेने केली आहे. संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती 9 जानेवारी रोजी बंद पाळतील अशी माहितीही त्यांनी दिली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने संतोष देशमुख यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली.
महाराष्ट्रात प्रथमच एवढ्या अमानुष, अमानवीय पद्धतीनं ही हत्या झाली असून यामधील आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. राज्यात परत कोणाचीही अशी हिंमत होणार नाही अशा पद्धतीचे कडक शासन आरोपींना करावे अशी मागणी सरपंच परिषदेने केली. संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायती 9 जानेवारी या दिवशी बंद राहतील, अशी माहिती सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
राज्यभरातले सरपंच मस्साजोगमधील घटनेमुळे हादरले आहेत. समाजसेवा करणे पाप आहे का ? हा प्रश्न राज्यातल्या सरपंचांना पडला आहे. त्यामुळे यामध्ये सरपंच संघटना आक्रमकपणे भूमिका मांडत असून याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली.
संतोष देशमुख यांच्या परिवाराला शासनाने कायमस्वरूपी संरक्षण द्यावं. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत शासनाने करावी अशी मागणी संरपंच परिषदेने केली आहे. तसेच संतोष देशमुखांच्या कुटुंबातील एक जणांना नोकरी शासकीय द्यावी आणि संतोष देशमुख यांचं भव्य असं स्मारक या गावांमध्ये उभा करावं अशीही मागणी करण्यात आली आहे.