| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ डिसेंबर २०२४
सांगलीचा लाचलुचपत विभाग गेल्या काही महिन्यापासून अधिक सक्रिय झाला आहे. अनेक शासकीय लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात आले आहेत. तरीही शासकीय अधिकारी व कर्मचारी लाच घेण्याच्या मानसिकतेतून दूर जाण्यास तयार नाहीत. असाच एक प्रकार सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला हवालदाराच्या बाबतीत घडल्याने पोलीस खात्यात खळबळ माजली आहे. एका फसवणुकीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी मनीषा कोनोळीकर उर्फ बडेकर या महिला पोलीस हवालदाराने एका आरोपीकडे 50 हजाराची लाच मागितली होती.
या आरोपीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर, या तक्रारीची शहानिशा करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल रात्री सांगलीवाडी येथे सापळा रचून बडेकर या महिला हवालदार रंगेहात ताब्यात घेतले आहे. यानंतर संशयित मनीषा कोनोळीकर उर्फ बडेकर यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.