yuva MAharashtra 4000 कोटींचा द्राक्ष उद्योग बदलत्या हवामानामुळे आला धोक्यात, जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीचा होणार परिणाम ?

4000 कोटींचा द्राक्ष उद्योग बदलत्या हवामानामुळे आला धोक्यात, जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीचा होणार परिणाम ?


         (फोटो सौजन्य - गणेश करमाळे, मालगाव)

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ डिसेंबर २०२
संपूर्ण महाराष्ट्रात नाशिक नंतर सांगली जिल्ह्याचे द्राक्ष उत्पादनातील आघाडी सर्वश्रुत आहे. या परिसरातील द्राक्षे थेट परदेशात जात असतात. द्राक्षाची गोडी ही हवामानावर अवलंबून असते. गेल्या काही वर्षातील बदलते हवामान हे द्राक्ष उत्पादनावर परिणाम करीत असल्याने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाला आहे.

यंदाचे हे वर्ष तर द्राक्ष उत्पादकांसाठी चिंतेचे ठरले आहे. सांगली जिल्ह्यात सुमारे 80 हजार एकर द्राक्ष बागेचे क्षेत्र आहे. हवामान बदल, शासनाची उदासीनता आणि दलाला कडून होणारी फसवणूक, त्यामुळे नेहमीच द्राक्ष उत्पादक अनेक संकटांना तोंड देत आला आहे. यंदा 30 हजार एकर क्षेत्रातील द्राक्ष बागायत दराने बागेवर कुऱ्हाड चालवली आहे. 


सलग चौथ्या वर्षी हवामानामुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम झाला असून द्राक्ष बागायतदार कर्जांनी बेजार झाला आहे. यापूर्वी सांगली जिल्ह्यात सव्वा लाख एकर द्राक्ष बाग होती मात्र गेल्या चार वर्षात द्राक्ष बागेला व उत्पादकांना हवामान बदलाचे संकट झेलावे लागत आहे. द्राक्ष बाग उत्पादनातून सुमारे चार ते साडेचार हजार कोटींची उलाढाल होत असते. तर बेदाणा व्यवसायाच्या माध्यमातून दीड हजारावर कोटींचे उलाढाल दरवर्षी होते.

द्राक्ष आणि बेदाणा उत्पादनावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होत असतो. मात्र बदलत्या हवामानासह दलालांकडून होणारी फसवणूक, द्राक्ष बागेवर नैसर्गिक आपत्तीसह वटवाघुळ, मुंगूस आदी प्राण्यांकडून होणारे नुकसान, कर्जाचे भरावे लागणारे हप्ते व व्याज या साऱ्यांचा द्राक्ष उत्पादकांवर प्रचंड ताण निर्माण होत आहे. लाखांचा पोशिंदा असलेला द्राक्ष उत्पादक स्वतः मात्र आर्थिक संकटात सापडला आहे. अनेकांना कर्जाचे परतफेड करण्यासाठी आपल्या जमिनी विकाव्या लागल्या आहेत. त्यामुळे शासनाने ऊस उत्पादकांना मदत देण्याची गरज व्यक्त होत आहे.

परिणामी अनेक द्राक्ष बागायतदार द्राक्षाची बाग उध्वस्त करून पुन्हा एकदा ऊस उत्पादनाकडे वळू लागला आहे. जर या भागातील द्राक्ष इंडस्ट्री कमी झाली तर याचा परिणाम थेट जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीवर तर होणार आहेच, परंतु या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या शेतमजूर कुटुंबावरही होणार आहे. परिणामी पुन्हा एकदा या भागातील बेरोजगारी वाढण्याची चिन्हे आहेत. आणि म्हणूनच शासनाने या समस्येचा सर्वांगीण विचार करून, द्राक्ष बागायतदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे.