| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ८ डिसेंबर २०२४
सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी व तासगाव कवठेमंकाळ हे दोन विधानसभा मतदार संघ. सध्या हे दोन मतदारसंघ एका आगळ्यावेगळ्या योगायोगाने चर्चेत आले आहेत. 1990 साली खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघातून (स्व.) अनिल बाबर तर तासगाव मधून (स्व.) आर. आर. आबा हे पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले. दोघांनीही आपल्या कार्यकर्तृत्वाने विधानसभा गाजवली. (स्व.) आर आर आबा यांना तर 'लक्षवेधीकार आमदार' म्हणून गौरवण्यात आले होते. त्यामुळे खानापूर-आटपाडी व तासगाव हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ संपूर्ण राज्यात वृत्तपत्रात चर्चेचा विषय बनले होते.
आज चौतीस वर्षानंतर पुन्हा एकदा खानापूर-आटपाडी व तासगाव-कवठेमहांकाळ एका योगायोगाने चर्चेत आले आहेत. ज्या खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व (स्व.) अनिल बाबर करीत होते, त्यांचेच सुपुत्र सुहास बाबर यांच्याकडे या विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व मोठ्या बहुमताने आले आहे. तर सर्वात तरुण आमदार म्हणून यापूर्वीच संपूर्ण राज्यात चर्चेला गेलेले रोहित पाटील हे तासगाव-कवठेमंकाळ विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
खरंतर योगायोग हा नव्हे... योगायोग हा आहे की, 34 वर्षापूर्वीचे दोन मित्र पहिल्यांदाच खानापूर आटपाडी व तासगाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत पोहोचले होते, त्या (स्व.) अनिल बाबर व (स्व.) आर. आर यांचे सुपुत्र, अनुक्रमे सुहास बाबर व रोहित पाटील हेही याच मतदारसंघातून पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले आहेत.
या योगायोगाची चर्चा संपूर्ण सांगली जिल्ह्यात घडत असताना, आता नागरिकांना उत्सुकता आहे ती, हे दोन्ही सांगली जिल्ह्याचे सुपुत्र विधानसभा आपल्या पित्याप्रमाणे गाजवतात याची. आ. सुहास बाबर व आ. रोहित पाटील दोघेही फर्डे वक्ते. स्व. अनिल बाबर व स्व. आर. आर. पाटील यांची मैत्री सर्वश्रुत होती. तशीच मैत्री या दोन्ही आमदार पुत्रांनी कायम ठेवली आहे.
सध्या आ. सुहास बाबर यांना शिंदे शिवसेना कडून मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते. तर आ. रोहित पाटील यांना विरोधी पक्षात राहून सरकार विरोधी आवाज बुलंद करावा लागणार आहे. विधानसभे बाहेरील हे दोन मित्र, विधानसभेत मात्र एका अर्थाने एकमेकांच्या समोरासमोर राजकीय शत्रू म्हणून उभे ठाकणार आहेत. आता या दोन्ही भूमिका हे तरुण नेते कशाप्रकारे निभावतात, याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.
फोटो सौजन्य - दै. ललकार, सांगली.