| सांगली समाचार वृत्त |
कवठेमहांकाळ - दि. ६ नोव्हेंबर २०२४
कवठे महांकाळ तालुक्यातील कोकळे-रांजणी रस्त्यावर अवैधरित्या सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारी कार पकडून सातारा येथील एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून विविध कंपन्यांची सुगंधी तंबाखू, इनोव्हा कार, असा १२ लाखांचे साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस सतीश शिंदे यांनी दिली.
ललित सुमेरमल कच्छिया (वय ५७, रा. बोपेगाव, ता. वाई, जि. सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्भूमीवर अवैधरित्या सुगंधी तंबाखू, गुटखा याची वाहतूक, विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथक कवठेमहांकाळ परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पथकाला कोकळे रांजणी रस्त्यावरून एका इनोव्हा कारमधून सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून ती कार अडवली. तिची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये विविध कंपन्यांच्या सुगंधी तंबाखूची पोती सापडली. त्याबाबत गाडीचा चालक कच्छिया याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने ती तंबाखू कनर्नाटकातून विक्रीसाठी आणत्याची कबुली दिली. त्यानंतर कारसह तंबाखू जप्त करून त्याला अटक करण्यात आली.
याबाबत कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो मिरज शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, संजय पाटील, सूर्यकांत साळुंखे, प्रमोद साखरपे, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केली.