| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ नोव्हेंबर २०२४
सांगलीतील संजयनगर परिसरासह सर्व ठिकाणच्या झोपडपट्टीवासियांना लवकरच त्यांच्या हक्काची घरे मिळतील, अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली. संजयनगर येथे आयोजित प्रचार फेरीच्या वेळी ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या - अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुजित काटे यांनी संजयनगर येथे प्रचार फेरीचे आयोजन केले होते. सुधीरदादा यांचे प्रचंड उत्साहात फटाक्यांच्या आतषबाजीत, वाजंत्रीच्या तालात पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले. सुधीरदादा गाडगीळ, माजी नगरसेवक शीतल पाटील, सुजित काटे तसेच उपस्थित नागरिकांनी नारळ फोडून प्रचार फेरीला सुरुवात केली.
सुजित काटे म्हणाले, सुधीरदादा संजयनगरमधील झोपडपट्टीवासियांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणार आहेत. त्यांना हक्काची घरे लवकरच मिळणार आहेत. सांगलीत ४२ ठिकाणी महापालिका क्षेत्रात झोपडपट्टीचा प्रश्न सुधीरदादा यांनी निकालात काढला आहे. जागांचे मोजमाप व लेआउटचे काम झाले आहे. काही झोपडपट्टीवासियांची नावेही सातबाराला लागली आहेत. तसेच सिटी सर्वेलाही नोंद होत आहे. त्यामुळे संजयनगर परिसरातील झोपडपट्टीवासीय सुधीरदादांच्या कामावर खुश आहेत. ते स्वतःहून प्रचार फेरीत सहभागी झाले असून दादांबद्दल आभार व्यक्त करीत आहेत. संजयनगर परिसरातून या खेपेसही सुधीरदादांना मोठे मताधिक्य देऊ, असे काटे यावेळी बोलताना म्हणाले.
संजयनगरमधून प्रचार फेरी चिंतामणीनगरकडे गेली. तेथे प्रत्येक चौकात दादांचे फटाक्यांची आतषबाजी आणि पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. काँक्रीटच्या रस्त्यावरून प्रचार फेरी निघाली होती.
भाजपा सांगली शहर उपाध्यक्ष दीपक माने, गिरीश शिंगणापूरकर, उमेश खोत, अर्जुन मदने, प्रियानंद कांबळे, विजय काटकर, युवराज काटकर, सचिन काटे, कल्पना काटे, सुरज पवार, रवींद्र सदामते, सुशांत काटे, सुशील काटे, निर्भय काटे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक प्रचार फेरीत सहभागी झाले होते.