yuva MAharashtra मुख्यमंत्रीपद... भाजपसाठी अवस्था 'धरलं तर चावते सोडलं तर पळतंय' !

मुख्यमंत्रीपद... भाजपसाठी अवस्था 'धरलं तर चावते सोडलं तर पळतंय' !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २६ नोव्हेंबर २०२
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, हा एकच प्रश्न सर्वतोमुखी आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळायला पाहिजे, अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचे यादृष्टीने भाजपच्या गोटातही पूर्ण तयारी झाल्याची माहिती आहे. अजित पवार यांना तसा संदेशही गेल्याचे सांगितले जाते. मात्र, मुख्यमंत्रीपद जाणार याची कुणकुण लागताच एकनाथ शिंदे हे कमालीचे सावध झाले आहेत. त्यांनी सोमवारी संध्याकाळपासून सगळ्या भेटीगाठी रद्द केल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र, भाजपचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आग्रही आहेत. तरीदेखील भाजपकडून अद्याप अपेक्षित हालचाली घडत नसल्याने पडद्यामागे नेमक्या काय हालचाली सुरु आहेत, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. आणि म्हणूनच मुख्यमंत्रीपद... भाजपसाठी 'धरलं तर चावते सोडलं तर पळतंय' अशी अवस्था झाली आहे...

एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत येत सत्तास्थापन केली तेव्हा भाजपकडे 105 आमदारांचे पाठबळ होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपला 132 जागांवर विजय मिळाला. अपक्ष आणि लहान घटकपक्षांचे पाठबळ मिळून भाजपच्या संख्याबळाचा आकडा 137 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. याचा अर्थ भाजप स्वबळावर सत्तास्थापन करण्यापासून फक्त 8 जागा दूर आहे. तरीही भाजप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी सावधपणे पावले का टाकत आहे, हा प्रश्न अनेकांना पडत आहे. इतके प्रचंड यश मिळूनही भाजपने अद्याप देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड का केली नाही?, याबाबत अनेकजण आपापल्यापरीने तर्क लावत आहेत.

अजित पवार फॅक्टर

यंदाच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजपसोबत आता 137 आमदारांचे आणि अजित पवार गटाचे पाठबळ आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे भाजपवर पूर्वीइतका दबाव टाकू शकत नाहीत. इतक्या सगळ्या गोष्टी अनुकूल असतानाही भाजप एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेण्याबाबत सगळ्या बाजू तपासून पाहत आहे. याचे कारण म्हणजे उद्धव ठाकरे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता उद्धव ठाकरे यांची ताकद किमान पुढील पाच वर्षांसाठी जवळपास संपल्यात जमा आहे, असा अनेकांचा समज आहे. मात्र, जरा बारकाईने विचार केल्यास उद्धव ठाकरे यांना मुंबईत मिळालेल्या 10 जागा या अजूनही भाजपसाठी डोकेदुखी मानली जात आहे. राज्यभरात ठाकरे गटाचा सुपडा साफ झाला असला तरी मुंबईत त्यांची ताकद अजूनही शिल्लक आहे. मुंबईतील 36 जागांपैकी 10 जागा ठाकरे गटाने जिंकल्या आहेत. तर शिंदे गटाला 6 जागा आणि भाजपला 14 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गट कमबॅक करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद न दिल्यास काय होणार ?

महायुतीने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद न दिल्यास शिवसेनेत नाराजी पसरेलच. पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला आयते कोलीत मिळेल. मुंबई ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. पालिकेचा 27 हजार कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प हा देशातील अनेक राज्यांपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे मुंबईची सत्ता काबीज करणे, भाजपसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे समजा आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तर शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या जातील.

उद्धव ठाकरे यांच्यानंतर भाजप एकनाथ शिंदे यांच्यासोबतही तसेच वागणार किंवा भाजपने केवळ सत्ता येईपर्यंत शिंदेंचा वापर करुन घेतला आणि आता त्यांना बाजुला सारले, असा मेसेज शिवसैनिकांमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे मराठी मतदारांच्या मनातही चलबिचल होऊ शकते. एवढी एक गोष्ट उद्धव ठाकरे यांना राखेतून पुन्हा उभारी द्यायला मदत करु शकते. कारण, मुंबईची ही निवडणूक ही केवळ एका महानगरपालिकेची असली तरी त्यामागे अनेक आर्थिक गणिते आहेत. ठाकरे गटाला पालिकेची सत्ता मिळाल्यास त्यांना प्रचंड मोठी आर्थिक रसद उपलब्ध होऊ शकते. याचा वापर करुन ठाकरे गट राज्याच्या राजकारणात पुन्हा मुसंडी मारण्याचा धोका नाकारता येत नाही. याशिवाय, महायुती सरकारच्यादृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पातही अडथळे येऊ शकतात. या सगळ्या कारणांमुळे एकनाथ शिंदे यांना तुर्तास मुख्यमंत्रीपदी कायम ठेवणे, ही भाजपची गरज मानली जात आहे. आज रात्री याबाबत चित्र स्पष्ट होईल.