| सांगली समाचार वृत्त |
तासगाव - दि. २७ नोव्हेंबर २०२४
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील मध्यवर्ती ठिकाण आणि दररोज साडेतीन ते चार लाख लोकांची वर्दळ असलेल्या 'टाईम्स स्क्वेअर' च्या चौकातील इमारतीवर नूतन आमदार रोहित पाटील यांची छबी विजयानंतर झळकली. रोहित यांच्या चाहत्यांनी महिनाभर आधी 'पेले सॉकर' या जगप्रसिद्ध दुकानाशेजारील इमारतीवरील जागा बुकिंग केली होती. 'टाईम्स स्क्वेअर' वर रोहितदादा झळकल्याची 'पोस्ट' समाजमाध्यमात व्हायरल झाली आहे.
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात माजी खासदार संजयकाका पाटील विरुद्ध आर. आर. आबांचे पुत्र रोहित पाटील यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना येथे रंगला होता. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे प्रचार सभा घेऊन चुरस वाढवली होती. अखेर रोहित पाटील यांनी बाजी मारली. पहिल्याच निवडणुकीत ते आमदार झाले.
रोहित पाटील यांच्या विजयानंतर मतदारसंघात सर्वत्र विजयाचे फलक झळकले. समाजमाध्यमांवर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. त्याचवेळी हजारो किलोमीटर दूरवर असलेल्या अमेरिकेतील सर्वांत मोठा चौक असलेल्या टाईम्स स्क्वेअर बिलबोर्डवर रोहित पाटील यांच्या अभिनंदनाचा फोटो झळकला. रोहित यांच्या चाहत्यांनी त्यांचा विजयोत्सव अमेरिकेत साजरा करण्यासाठी महिनाभर अगोदर प्रयत्न केला होता. अभिनंदनाच्या जाहिरातीसाठी जागा निश्चित केली होती.
रोहित यांचा फोटो न्यूयॉकमधील टाईम स्क्वेअर चौकात झळकल्यानंतर त्याची छायाचित्रे सध्या समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे. 'रोहितदादा अमेरिकेतही झळकले' असे चाहते सांगत आहेत. रोहित यांचे चुलते निवृत्त पोलिस अधिकारी राजाराम आर. पाटील यांनी याला दुजोरा दिला.