yuva MAharashtra सांगली जिल्ह्यात तिशीच्या आतील साडेपाच लाख मतदार ठरणार निर्णायक !

सांगली जिल्ह्यात तिशीच्या आतील साडेपाच लाख मतदार ठरणार निर्णायक !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ नोव्हेंबर २०२
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडी व महायुतीकडून तुल्यबळ लढतीचे उमेदवार देण्यात आले आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक काट्याच्या लढती होण्याचे चित्र आहे. यामध्ये एकूण २५ लाख ३६ हजार ६५ मतदार आहेत. यापैकी ३० वर्षांआतील ५ लाख ४३ हजार ५४७ मतदार आहेत. या तरुणांचाच कौल निर्णायक ठरणारा आहे. खानापूर मतदारसंघात सर्वाधिक ७७ हजार ३६ आणि सर्वात कमी ५८ हजार ७५९ इस्लामपूरमध्ये युवा मतदार आहेत.

पदवीचे शिक्षण घेऊन तरुण रोजगाराच्या शोधात फिरत आहे. शासकीय नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहे. स्पर्धा जीवघेणी ठरत आहे. सरकारी भरतीतील दहा जागांसाठी लाखोंवर उमेदवारांचे अर्ज येतात. साधा शिपाई बनण्यासाठी उच्चशिक्षित तरुण तयार होतो. बेरोजगारीचा बकासूर अनेकांचे भविष्य अंधकारमय करीत आहे. हाताला रोजगार नसल्याने विवाहाचे वयही वाढत चालले आहे.


दुसरीकडे शेती या परंपरागत व्यवसायात आता नफा मिळणे बंद झाला आहे. त्यामुळे रोजगारासाठी घराबाहेर पडण्याशिवाय स्थानिक युवकांपुढे पर्याय नाही. सध्याच्या तरुणांपुढे रोजगार हाच एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत येत्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. बेरोजगारी कमी करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजना अतिशय तुटपुंज्या आहेत. राजकीयदृष्ट्या जागरूक असणारा युवा वर्ग या निवडणुकीत निर्णायक मतदान ठरणार आहे.

राजकीय पक्षासोबतच स्थानिक उमेदवारांना सुद्धा मतदारसंघातील युवा मतदारांना आकर्षित करता येईल असे मुद्दे प्रचारात घ्यावे लागणार आहेत. युवकांच्या समस्या आणि त्यावरील उपाय प्रभावीपणे या प्रचाराच्या रणधुमाळीत मांडावे लागणार आहेत. तरच हा युवा मतदार मतांचे दान देण्याची तयारी दाखवणार आहे.
आठ विधानसभेत १८ ते १९ या वयोगटातील ५६ हजार ६५० मतदार आहेत. तर २० ते २९ या वयोगटातील ४ लाख ८६ हजार ८९७ मतदार आहेत.

तिशीच्या आतील मतदार असलेले मतदारसंघ संख्या

मिरज- ७१०३५
सांगली- ७१३७१
इस्लामपूर- ५८७५९
शिराळा- ६२९११
पलूस-कडेगाव- ६५६५९
खानापूर- ७७०३६
तासगाव-क.महांकाळ- ६७४६८
जत- ६९३०८