| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ नोव्हेंबर २०२४
कोल्हापूरचे आमदार श्री. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातील महाआघाडी तथा काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराजबाबा गुलाबराव पाटील यांच्यासाठी मतदारांना आवाहन केले आहे.
✌️ सतेज पाटील यांचे आवाहन ✌️
उद्या बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी महाआघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत होत असून सत्ता स्थापनेसाठी दोन्हीही आघाडीला एक एक उमेदवार आणि मत अत्यंत महत्त्वाचे आहे. गेले पंधरा दिवसांवर अधिक काळ महायुती आणि महाआघाडीचे स्टार प्रचारक मतदारांना आवाहन करण्यासाठी पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र दौरे करीत आहेत.
सांगली विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. येथे महायुती तथा भाजपचे सुधीरदादा गाडगीळ हे हॅट्रिकच्या जिद्दीने मैदानात उतरले आहेत. तर त्यांना तोडीस तोड फाईट महाआघाडी तथा काँग्रेस पखक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराजबाबा पाटील हे देत आहेत. त्याचवेळी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्रीताई पाटील यांनी या दोघांसमोर चांगलेच आव्हान उभे केले आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते कोल्हापूरचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातील मतदारांना पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन एका खास व्हिडिओद्वारा केले आहे.