yuva MAharashtra निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज जिल्हाधिकारी राजा दयानिधी, सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा !

निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज जिल्हाधिकारी राजा दयानिधी, सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ नोव्हेंबर २०२
सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात निवडणूकीत जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून येत्या २० नोव्हेंबरला जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी पत्रकार बैठकीत केले. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे हे ही उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, सांगली जिल्ह्यात शहरी भागात ६६४, ग्रामीण भागात १८१८ मतदान केंद्रे असून जिल्ह्यात एकूण २४८२ मतदान केंद्रे आहेत सांगली जिल्ह्यातील २५ लाख ३६ हजार ०६५ मतदार असून, त्यापैकी १२ लाख ८२ हजार २७६ पुरुष तर १२ लाख ५३ हजार ६३९ महिला आणि १५० तृथींयपंथी मतदार आहेत.

अंदाजे १३ हजार कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार असून त्यांच्यासाठी पुरेसी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या सकाळी कर्मचारी आपआपल्या मतदान केंद्रावर पोहोचणार असून बुधवार सकाळी ७ ते सायं. ७ यावेळेत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल अशी माहितीही त्यांनी दिली.

मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असून, मतदारांनी आपले मोबाईल स्वतःच्या गाडीत अथवा जबाबदार व्यक्तीकडे ठेवूनच मतदान करावे असे आवाहनही त्यानी केले. आचारसंहिता सुरू झाल्यापासून सांगली जिल्ह्यात रोख रक्कम, दारु, गुटखा व अवैद्य ३ कोटीचा साठा जप्त करण्यात आला आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

यावेळी बोलताना जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी जिल्ह्यात २४०३ जणांना शस्त्र परवाना आहे त्यापैकी २२० वगळता इतर सर्व शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. निवडणूक काळात जिल्ह्यात अनुचित प्रकार घडलेला नाही. ४ दखलपात्र आणि ४ अदखलपात्र गुन्हे दाखल झाले असून, ९ ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. आजपासून सांगली जिल्ह्यातील सर्व बार, लिकर दुकान बंद करण्यात आले असून शेजारच्या विजापूर व बेळगांव जिल्ह्यातही ५ कि.मी. क्षेत्रातील बार व लिकर दुकाने बंद करण्यास कर्नाटक प्रशासनाला अवगत करण्यात आले आहे अशी माहिती देण्यात आली.