| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० नोव्हेंबर २०२४
सांगली पॅटर्न सांगलीत घडू नये यासाठी आम्ही एक आहोत आणि एक राहणार आहे, आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील हे एक व्यक्ती असल्यासारखे घट्ट असल्याची प्रतिक्रिया खासदार विशाल पाटील यांनी दिली आहे.
ज्या लोकसभेल विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांची राम लखनप्रमाणे जोडी दिसून आली तेच विधानसभेला सांगलीच्या जागेवरून एकमेकांविरोधात असल्याचे दिसून आलं आहे. आमदार विश्वजीत कदम सांगली विधानसभेतील काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी आहेत. खासदार विशाल पाटील अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या पाठीशी आहेत.
यावरून विरोधकांकडून मतदार व कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण करण्यात येत आहे असे सांगून, विशाल पाटील म्हणाले की, सांगली विधानसभेमधील प्रश्न हा काँग्रेस अंतर्गत प्रश्न आहे. सांगली विधानसभेला काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर तो करून घेऊ नये. कारण सांगलीत भाजपचा पराभव होणार निश्चित आहे आणि तो पराभव आम्ही करुन दाखवू, असा विश्वास खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे.
सध्या सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून पृथ्वीराज पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचा थेट सामना महायुती भाजपचे उमेदवार सुधीरदादा गाडगीळ यांच्याशी आहे. तर काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी या दोघांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. मतदारसंघातील इतर अपक्ष उमेदवारांना मतदारांचा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर पृथ्वीराजबाबा पाटील, सुधीरदादा गाडगीळ व श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या मोठी चुरस दिसून येत असून, मतदारांमध्ये यापैकी कोण बाजी मारणार याचीच सध्या चर्चा दिसून येत आहे.