| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ नोव्हेंबर २०२४
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीच सरकार सत्तेवर येणार हे स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होता. मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रात जे घडलं ते लोकशाहीच्या दृष्टीने अजिबात चांगलं नव्हतं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन मोठे पक्ष फुटले. आधी एकनाथ शिंदे यांच्या मदतीने भाजपने युती सरकार बनवलं. नंतर अजित पवार सहभागी झाल्यानंतर ते महायुतीच सरकार बनलं. उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवसापर्यंत पक्षांतर सुरु होती. कोण कुठल्या पक्षातून लढणार? हेच कळत नव्हतं. महाराष्ट्राच्या राजकारणाची भेळ झाली होती. त्यामुळे मतदार राजाकडून एक स्पष्ट कौल हवा होता. आज तो कौल मिळाला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळेल इतक्याही जागा जिंकता आलेल्या नाहीत. खरतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल चक्रावून टाकणारा आहे. भाजप, महायुती विरोधक निकालावर वेगवेगळ्या प्रकारे संशय व्यक्त करत आहेत. कारण सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने लोकसभेच्या 31 जागा जिंकल्या होत्या. महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. सहसा सहा महिन्यात जनमत बदलत नाही. पण महाराष्ट्रात असं घडलयं. सहा महिन्यापूर्वी ज्या मविआने महाराष्ट्राच मैदान मारलं होतं. त्यांना विधानसभेला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्या इतपतही जागा जिंकता आलेल्या नाहीत.
मविआची मोठी चूक काय ?
महाराष्ट्रात महाविकास आघाडीची अशी अवस्था होण्यामागे वेगवेगळी कारणं असली, तरी प्रमुख कारण आहे, नकारात्मक प्रचार. महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना, ज्येष्ठांसाठी, युवकांसाठी स्टायपेड अशा वेगवेगळ्या योजना आणल्या. शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली, त्याचा मतदारांवर परिणाम झाला हे खरं आहे. पण महायुतीच सरकार हटवल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासासाठी काय प्लान आहे? पर्यायी योजना काय आहेत? हे मतदार राजाला पटवून देता आलेलं नाही.
म्हणूनच महायुती जिंकली !
मविआने फक्त महायुती सरकारवर टीका करण्यात जास्त शक्ती खर्च घातली. या उलट महायुतीने बटेंगे तो कटेंग, एक हैं तो सेफ हैं असे मुद्दे प्रचारात आणले. पण महाराष्ट्राचा विकास कसा केला हे सुद्धा ते सांगत होते. महाविकास आघाडीला मात्र, महाराष्ट्राचा विकास कसा करणार? हे सांगता आलं नाही. जागा वाटपावरुन तसेच मुख्यमंत्री पदावरुन मविआमध्ये मतभेद दिसून आले. महायुतीने मात्र लोकसभेतील पराभवातून धडा घेत चूका सुधारल्या. म्हणूनच महायुती जिंकली.