yuva MAharashtra तासगाव अर्बन बँकेतील चोरी प्रकरणी २४ तासाच्या आत एकास अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे कौतुकास्पद कार्य !

तासगाव अर्बन बँकेतील चोरी प्रकरणी २४ तासाच्या आत एकास अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे कौतुकास्पद कार्य !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ नोव्हेंबर २०२
शहरातील मार्केट यार्डातील तासगाव अर्बन बँकेतील चोरीचा प्रयत्न करणाऱ्यांचा २४ तासांच्या आत छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली, तर दोघेजण पसार झाले आहेत. यामध्ये कराड (जि. सातारा) येथील एका चोरट्याचा समावेश आहे. अटक केलेल्या चोरट्याकडून कोयता, चाकू, लोखंडी कटावणी जप्त करण्यात आली आहे.

ओंकार विशाल साळुंखे (वय १९, रा. राजीवगांधी झोपडपट्टी, जुना बुधगाव रोड, सांगली), सुदर्शन यादव (रा. कराड, जि. सातारा, सध्या रा. विश्रामबाग) आणि मुनीब उर्फ बाबू भाटकर (रा. आंबा चौक, सांगली) अशी संशयितांची नावे असून यातील ओंकार साळुंखे याला अटक करण्यात आली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, मार्केट यार्डातील सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या इमारतीत तासगाव अर्बन बँकेची शाखा आहे. मंगळवारी रात्री दोघेजण बँकेत शिरले. चोरट्यांनी आधी दरवाज्यावरील अलार्मची वायर कापली. त्यानंतर सीसीटीव्ही वळविले. बँकेतील स्टाँग रुम फोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ती फोडता आली नाही. दोघांनी तिसऱ्या साथीदारालाही बँकेत बोलाविले. त्यानेही स्टाँग रुम फोडण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही यश आले नाही. अलार्मची वायर कापल्यानंतर त्याचा अलर्ट मेसेज बँकेच्या अधिकाऱ्यांना गेला. त्यांनी तातडीने विश्रामबाग पोलिसांना घटनेची माहिती दिली. विश्रामबाग व एलसीबीचे पथकाने मध्यरात्री मार्केट यार्डात धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच चोरटे पसार झाले होते. पोलिसांनी बँकेसह आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाला सुरूवात केली.

एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी विशेष पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकामधील अनिल कोळेकर व विक्रम खोत यांना सुदर्शन यादव, ओंकार साळुंखे व मुनीब भाटकर या तिघांनी बँक फोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. तिघेही मीरा हौसिंग सोसायटीलगत तात्यासाहेब मळ्यात लपल्याची समजताच एलसीबीचे पथकाने तातडीने धाव घेतली.

तात्यासाहेब मळा येथील निकुंज लॉनच्या भिंतीलगत ओंकार साळुंखे थांबला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सॅकची तपासणी केली. त्याच्याकडून धारदार चाकू, कोयता, कटावणी, मारतूल आदि साहित्य मिळून आले. त्याने यादव व भाटकर याच्या मदतीने बँकेचे कुलुप कटावणीने तोडून चोरी करत असताना सायरन वाजल्याने पळून गेल्याची कबुली दिली. संशयित व मुद्देमाला विश्रामबाग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. उर्वरित दोन चोरटे पसार झाले असून त्यांच्या शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले.

तासगाव अर्बन बँकेच्या चोरीप्रकरणातील तिघेही संशयित चोरटे सराईतांच्या यादीवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर, मिरज ग्रामीण आणि कराड पोलिस ठाण्यात चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

बँकेत चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर तिघेजण मार्केट यार्डातून पसार झाले. त्यानंतर तिघांनी मल्टिप्लेक्स टॉकीजच्या पाठीमागील कॉलनीमधील बंद घर फोडून चांदीचे साहित्याची चोरी केली. त्यानंतर ते पसार झाले होते. या घरफोडीची कबुली चोरट्याने पोलिसांना दिली आहे.