| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २९ नोव्हेंबर २०२४
काल नवी दिल्ली येथे भाजपचे केंद्रीय नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची अडीच तास चाललेली बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली. आज सकाळी मुंबईत या तिन्ही नेत्यांची बैठक होणार होती. परंतु ही बैठक आता दोन दिवसानंतर होणार असून, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी दरे येथे जाण्यासाठी निघाले आहेत.
कालच्या नवी दिल्लीतील बैठकीत मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात एकनाथ शिंदेकडून 12 मंत्रिपदांची मागणी करण्यात आली आहे. या मंत्रिपदामध्ये गृहखाते, नगरविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम खात्यांसह विविध महत्त्वाच्या खात्यांचा समावेश आहे. मात्र गृह खाते सोडण्यास भाजपने नकार दिला आहे. भाजपकडून एकनाथ शिंदेंना थेट उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे.
केंद्रातील कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाची ऑफर शिंदे यांनी अमान्य केली असून, पक्ष वाढीसाठी ते महाराष्ट्रातच राहू इच्छितात. भाजपने त्यांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची दिलेले ऑफर स्वीकारावी असे शिंदे यांच्या शिवसेनेतील काही वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र याबाबतही अजून अधिकृतरित्या काहीही जाहीर करण्यात आले नाही.
काल दिल्लीहून परतण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्ध माध्यमांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी महायुती एकसंघ असून आमच्यात कोणताही वाद नाही. लाडका भाऊ म्हणून माझी जी प्रतिमा निर्माण झाली आहे ती कोणत्याही पदापेक्षा मोठी आहे. यावेळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमातून व्हायरल झालेल्या आपल्या गंभीर चेहऱ्याच्या फोटो बाबत हसत हसत प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, माझा गंभीर आणि हसमुख चेहरा हे तुम्हीच ठरवता, माझ्या मनात कोणतीही कटुता नाही. मी परवाच मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला असून, भाजपच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आमच्यातील वाद ही सारी विरोधी पक्षाची खेळी आहे असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
मात्र त्यामुळे आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा व मंत्रिमंडळ स्थापण्याचा निर्णय दोन दिवसानंतर होणार असल्याने, मुख्यमंत्री व मंत्र्यांचे शपथविधी कधी होणार हे त्याचवेळी जाहीर होईल. तोपर्यंत चर्चा तर होणारच...