| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० नोव्हेंबर २०२४
सांगली-कोल्हापूर रस्त्यावर कृष्णा नदीवरील अंकली (ता. मिरज) पुलावर बुधवारी मध्यरात्री खेडेकर कुटुंबावर काळ कोसळला. अपघात घडलेले ठिकाण धोकादायक आणि जीवघेणे असेच आहे. या रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ पाहता हा पूल अपघातांचे केंद्र ठरला आहे. किंबहुना अंकली येथील महामार्ग चौकापासून जयसिंगपूर शहरापर्यंतचा रस्ता वाहनचालकांसाठी प्रचंड धोकादायक आणि डोकेदुखीचा ठरला आहे.
बुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात प्रसाद भालचंद्र खेडेकर (वय ३६), प्रेरणा प्रसाद खेडेकर (३५, दोघेही रा. मारुती रस्ता, गावभाग, सांगली) आणि वैष्णवी संतोष नार्वेकर (२१, रा. आकाशवाणी केंद्राजवळ, सांगली) यांचा मृत्यू ओढवला. जयसिंगपूरकडून सांगलीकडे येताना नदीच्या पुलावरून त्यांची चारचाकी नदीपात्रात कोसळली. गाडी कोसळलेले पात्र पूर्णत: कोरडे आहे. तसेच तेथे दगड किंवा पुलाचे बांधकाम असा कोणताही भाग नाही. गाडी सुमारे ३० फूट उंचीवरून खाली आदळल्याने जोराचा मार लागून तिघांचा मृत्यू झाला. गाडी जेथून नदीपात्रात कोसळली, तो रस्त्याचा भाग धोकादायक आणि तीव्र वळणाचा आहे. गाडी कोसळलेल्या ठिकाणी कठडा नाही. जयसिंगपूरहून वेगाने आलेली मोटार या मोकळ्या जागेतून थेट खाली गेली.
अवघ्या एका फुटाने मृत्यूने गाठलेगाडी कोसळली त्या जागेवरून अवघ्या एका फुटावर सिमेंटचा सुरक्षा कठडा सुरू होतो. अनियंत्रित झालेली गाडी फूटभर अंतर जरी पुढे आली असती, तरी कठड्याला धडकून रस्त्यावरच राहिली असती. तिघांचेही जीव वाचले असते. पण तसे होऊ शकले नाही.
पथकर नाका चौक म्हणजे मृत्यूचा सापळाच
पथकर नाक्याजवळील हा चौक म्हणजे मृत्यूचा सापळाच आहे. सांगली-जयसिंगपूर, जयसिंगपूर- सांगली आणि जयसिंगपूर-सांगली बायपास हे तीन रस्ते येथे एकत्र येतात. बायपास रस्त्यावरून सांगलीकडे येणारे वाहन चढणीमुळे वेगाने असते. त्याला दिशादर्शनासाठी कोणताही फलक लावलेला नाही. गोंधळलेला चालक थेट सांगली-जयसिंगपूर रस्त्यावर येण्याचा धोका असतो. चौकातील रस्ता अत्यंत खराब असून सर्वत्र धूळ पसरलेली असते. येथे गतिरोधक, मार्गदर्शक फलक किंवा सिग्नल नाहीत. पुरेसे पथदिवेही नाहीत. भरीस भर म्हणून छोट्या व्यावसायिकांनी रस्त्याकडेला दुकाने थाटली आहेत.
पुलावरील रस्ता झुडपांनी भरलेला
सांगली ते जयसिंगपूर आणि जयसिंगपूर ते सांगली हे पुलावरील दोन्ही रस्ते झाडीझुडपांनी भरले आहेत. झुडपांमुळे त्यांची रुंदी कमी झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना भरावावर मोठ्या प्रमाणात झुडपांचे साम्राज्य आहे. त्यामध्ये रस्ता हरवून जातो. धोकादायक वळणांवर रिफ्लेक्टर किंवा फलक नाहीत. पुलावरील कठड्यांचा रंगही निघून चालला आहे. दररोज ४० हजारांहून अधिक वाहने धावणाऱ्या या रस्त्याच्या सुरक्षिततेकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. परराज्यातून किंवा परजिल्ह्यातून आलेला चालक या पुलावरून प्रवास करताना हमखास गोंधळतो.