| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २२ नोव्हेंबर २०२४
संपूर्ण राज्यासह देशाला आतुरता लागून राहिलेला विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीची अखेर सांगता झाली आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठीचे बुधवारी मतदान पार पडले असून मतदारांचा अंतिम कौल मतपेटीत कैद झाला आहे. तर येत्या २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर राज्याच्या सत्तेच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ही मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामधून यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, याबद्दल संकेत मिळत आहेत. विविध संस्थांच्या या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार यंदा नागपूर, विदर्भासह राज्यात कोण बाजी महाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
निवडणुकांची रणधुमाळी संपताच नागपुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी संघ मुख्यालयाला भेट दिल्याची माहिती आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी पंधरा मिनिटे चर्चा केल्याचीही माहिती पुढे आली आहे. दरम्यान, राज्याच्या मतदारांचा कौल मतपेटीत कैद झाल्यानंतर तडकाफडकी घेतलेल्या या भेटीमुळे एक वेगळं महत्व प्राप्त झाले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मतदान केल्यानंतर दिवसभर नागपुरातील वेगवेगळ्या बूथवर जाऊन भाजप कार्यकर्त्यांची भेट घेत होते. संध्याकाळी मतदान पूर्ण झाल्यानंतर फडणवीस अचानक संघ मुख्यालयात पोहोचले आणि त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. सुमारे १५ ते २० मिनिट फडणवीस संघ मुख्यालयात होते. त्यामुळे या भेटीमागील कारण अद्याप कळू शकले नसले तरी या भेटीमुळे अनेक तर्क वितर्क राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जात आहे.
विविध संस्थांच्या निवडणूक अंदाजानुसार पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्यास चे पुढे आले आहे. या अंदाजानुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. आणि असे झाल्यास मुख्यमंत्री पदावर त्याची वर्णी लागणार याची ही उत्सुकता आहे. निवडणुकीपूर्वी महायुती असो वा महाआघाडी 'जो पक्ष सर्वात मोठा ठरेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री' असे सूत्र ठरले होते. त्यामुळे भाजपा सर्वाधिक मोठा पक्ष ठरण्याचे संकेत मिळत असून, तसे झाल्यास भाजपामधून देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा आघाडीवर आहे. फडणवीस यांच्याशिवाय इतरही काही नावे पक्षाच्या आणि मुख्य म्हणजे संघाच्या विचाराधीन आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस-सरसंघचालक यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त होत आहे.