| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ नोव्हेंबर २०२४
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार यांनी दलित समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय घेतले आहेत. काही निर्णयांची कार्यवाहीसुद्धा केली आहे. त्यामुळे आम्ही भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा जाहीर करत आहोत. दलित महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुधीरदादा गाडगीळ यांच्यासह महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करतील, पाठिंबा देतील. सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्यासह जिल्ह्यातील आणि राज्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना दलित महासंघाने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे आणि पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सतीश मोहिते यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रा. सकटे यांनी एक निवेदनही प्रसिद्धीला दिले.
प्रा. सकटे यांनी दिलेली माहिती अशी, केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने २६ नोव्हेंबर हा संविधानदिन म्हणून जाहीर केला असून तो साजरा करण्यासही सुरुवात केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर खरेदी करून तेथे शिक्षाभूमी स्मारक उभे करण्यात आले आहे. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मास्को येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उभा केला. त्यांच्याच हस्ते त्या पुतळ्याचे अनावरणही झाले. चिरागनगर (मुंबई) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे ३०५ कोटी रुपये खर्च करून स्मारक उभारण्यात येणार आहे. वाटेगाव या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक उभारण्यास महायुती सरकारने २५ कोटी रुपये निधी दिला आहे. आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी १२० कोटी रुपयांचा निधी दिला असून स्मारकाच्या कामालाही प्रारंभ झाला आहे. अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (आर्टी, मुंबई) या संस्थेची महायुती सरकारने स्थापना केली आहे. अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षण उपवर्गीकरणास गती देण्याच्या दृष्टीने निवृत्त न्यायाधीश बदर यांच्या अध्यक्षतेखाली महायुती सरकारने अभ्यास समिती नियुक्त केली आहे. असे प्रा. सकटे यांनी म्हटले आहे.
जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवल्यामुळे त्या राज्यात भारतीय संविधानाची आता अंमलबजावणी सुरू झाली आहे. असे सांगून प्राध्यापक मच्छिंद्र सकटे म्हणाले की, महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता येणे हेच दलितांच्या भल्याचे आहे, त्यामुळे दलित समाजाने सुधीरदादा गाडगीळ यांनाच मतदान करावे. गेल्या दहा वर्षात सुधीर दादांनी सांगली आणि विधानसभा मतदारसंघामध्ये दलित वस्तीसाठी विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. आगामी पाच वर्षात ही ते मतदारसंघाच्या आणि दलितांच्या विकासासाठी कार्यरत राहतील याचा आम्हाला विश्वास आहे असेही प्रा. सकटे म्हणाले.