| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ नोव्हेंबर २०२४
नालासोपाऱ्यात रेल्वे सीटीने मराठी दांपत्यावर दादागिरी केल्याची संपातजनक घटना समोर आली आहे. रेल्वे टीसीला मराठीत बोलण्यास सांगितलं असता त्याने प्रवाशाला डांबून त्याच्याकडून लेखी माफीनामा लिहून घेतला. रितेश मौर्य असं या हिंदीभाषिक टीसीचं नाव आहे. या बातमीनंतर टी सी रितेश मोर्याचं निलंबन करण्यात आलं आहे. याप्रकरणी मराठी एकीकरण समितीने ठिय्या आंदोलनही केलं होतं. जर कारवाई केली नाही तर त्याला शोधून काढू अशी धमकीच त्यांनी दिली होती.
रेल्वे प्रवासी अमित पाटील आणि त्यांच्या पत्नी यांच्यासोबत ही घटना घडली. रविवारी रात्री साडे 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास नालासोपारा रेल्वे स्थानकात हे सर्व घडलं. टीसीने रेल्वे स्थानकात तिकीट तपासण्यासाठी पाटील जोडप्याला अडवलं होतं. पण यावेळी त्यांना टीसीची भाषा समजली नाही. पाटील दाम्पत्याने टीसीला मराठीत बोलण्याची विनंती केली. पण टीसीने त्याला नकार दिला. इतकं नाही तर 'हम इंडियन है हिंदी मे बोलेंगे, रेल्वे मे मराठी नही चलेगा' असं सुनावलं.
टीसी रितेश मौर्य याने पाटील दाम्पत्याला आरपीएफ कार्यालयात बसवून ठेवलं. यादरम्यान त्याने त्यांच्याशी हुज्जत घातली. तसंच पोलिसांना बोलावून धमकावलं असाही आरोप आहे. इतकंच नाही तर प्रवाशाकडून मी मराठी भाषेचा आग्रह धरणार नाही, मराठी भाषेची मागणी करणार नाही असं लिहून घेतलं. एवढंच नाही तर पाटील दाम्पत्याकडून मराठी बोलणार नाही असं लेखी लिहून घेतलं. याशिवाय त्यांनी काढलेला व्हिडीओ जबरदस्तीने डिलीट केला. ही घटना समोर आल्यानंतर संताप व्यक्त होऊ लागला होता. तसंच वसई विरार मराठी एकीकरण समितीने याप्रकरणी नालासोपारा रेल्वेस्थानाकात ठिय्या आंदोलन करत जाब विचारला होता.
पश्चिम रेल्वेनेही याप्रकरणी 'एक्स'वर ( पूर्वीचे ट्विटर) पोस्ट शेअर करत दिलगिरी व्यक्त केली आहे. पश्चिम रेल्वे देशातील सर्व भाषा आणि आपल्या सर्व प्रवाशांचा सन्मान करते व विविधतेत एकतेवर विश्वास ठेवते. आमच्यासाठी सर्व धर्म, भाषा, प्रदेशातील प्रवासी समान आहेत, त्यांना उत्तम सेवा पुरवणे हेच आमचे ध्येय आहे. वरील विषयाची चौकशी केली जाईल आणि काही दोष आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल असं पश्चिम रेल्वेने सांगितलं.