| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ नोव्हेंबर २०२४
दवाखाने ही आपली तीर्थक्षेत्रं आहेत. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी हे आपले देवदूत आहेत. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ते अहोरात्र कष्ट घेतात.आटोकाट प्रयत्न करुनही काही वेळा रुग्ण दगावतो आणि मग कारण मिमांसा न करता, वास्तव लक्षात न घेता डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले होतात. प्रामाणिकपणे रुग्ण सेवा करुनही त्यांना त्रास होतो. याबाबतीत जरब बसेल असा कायदा स्वतंत्र कायदा नाही. मला आमदार म्हणून निवडून दिल्यास मी विधीमंडळात असा कायदा करण्यासाठी आवाज उठवणार आहे. असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले. डाॅ. प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वारणा सांस्कृतिक हाॅल मार्केट यार्ड सांगली येथे आयोजित डाॅक्टर मेळाव्यात ते बोलत होते.
मी डाॅक्टर नसलो तर डॉक्टर तयार करणारे होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज चालवितो. मी फार्मासिस्ट आहे. त्यामुळे माझा डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्याशी कायम संबंध येतो.. मी त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतो. मला आपला फार्मासिस्ट बंधू म्हणून माझ्या नावासमोरील हात चिन्हासमोरील बटण दाबून मला निवडून द्या. मी आपणास निर्भयपणे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करीन पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी डॉ. प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून उदंड दीर्घायुरारोग्याच्या शुभेच्छा दिल्या.
पृथ्वीराज पुढे म्हणाले, 'मी गेल्या दहा वर्षांत सांगलीची प्रामाणिक सेवा केली आहे. कोरोना व महापूर काळात लोकांची जीवीत व वित्त रक्षण केले आहे. विद्यमान आमदारांनी सांगलीच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यांनी निवडणुकीला उभा राहणार नाही म्हणून जाहीर केले. असा पराभूत मनोवृत्तीचा आमदार सांगलीचा विकास कसा करणार. सांगलीतील जनतेला कर भरुनही सुविधा मिळत नाहीत. शुध्द व मुबलक पाणी पुरवठा नाही. शेरीनाल्याचे घाण पाणी पिऊन जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांत एकदाही विधीमंडळात आमदारांनी या प्रश्नावर तोंड उघडले नाही. अशा आमदाराला आता बदलण्याची गरज आहे. सांगलीत आणि महाराष्ट्रात अल्पवयीन मुली आणि महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या पण आमदार मूग गिळून गप्प बसले आहेत. मला निवडून दिल्यास मी सांगलीला शुध्द आणि पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी लक्ष घालणार आहे. रस्ते, गटारी, , स्वच्छता या बाबीकडे अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. व्यापारी पेठेत एकही महिला स्वच्छता गृह नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. हे सारं मला सुरळीत करायचं आहे. माझ्या हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी मला निवडून द्या. आपल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी कटीबध्द आहे. असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले.
यावेळी वाढदिवस कार्यक्रमाचे संयोजक डॉ. सी. बी. जाधव, डॉ. पृथ्वीराज मेथे, डॉ. किशोर ठाणेदार, डॉ. सौ. टी. ए. बिडीवाले, डॉ. विक्रम कोळेकर, डॉ. राजेंद्र मेथे व डॉक्टर मंडळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.