| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ नोव्हेंबर २०२४
जिनकी जितनी भागीदारी, उनकी उतनी हिस्सेदारी' असा काँग्रेसचा नारा आहे. त्यातून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा डाव आहे. त्यासाठीच जातनिहाय जनगणनेची मागणी ते करत आहेत, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
यावेळी बोलताना विनोद तावडे म्हणाले, समाज जातीजातीत विभागण्याचा काँग्रेसचा डाव आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणनेची मागणी काँग्रेसह विरोधी पक्षांकडून होत आहे. मतांसाठी जनतेला भूलवण्याचे काम विरोधक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक हैं तो सेफ हैं' असा नारा दिल्यानंतर विरोधक त्यांच्यावर तुटून पडले. त्यातून विरोधकांची मानसिकता लपून राहत नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसने ओबीसींचे आरक्षण मुस्लिम समाजाला देत ओबीसींमधील घटकांना हक्कांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला.
मराठा आरक्षणाची मागणी जुनी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. भाजपने मात्र 13 टक्के आरक्षण दिले. उच्च न्यायालयात ते टिकले. भाजपची सत्ता असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला धक्का लागला नाही; मात्र ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू योग्य प्रकारे मांडली नाही. पुरेशी कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे आरक्षण रद्द झाले. महायुती सरकारने मराठा आरक्षण दिले आहे. ते सर्वोच्च न्यायालयातही टिकवू, असेही ठामपणे विनोद तावडे यांनी सांगितले.