| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ नोव्हेंबर २०२४
जिल्ह्यात साखर कारखान्यांची धुराडी पेटून पंधरवडा झाला तरी साखर कारखान्यांनी अद्यापही भाव काही ठरेना, त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांची धुराडी पेटली तरी ऊस कापणारा कोयता मात्र थंडच, अशी विचित्र अवस्था यंदा झाली आहे. खरे तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वच साखर कारखान्यांकडून लवकर दर ठरतील, अशी अपेक्षा होती.
प्रत्यक्षात उलटच झाले आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदार विधानसभा निवडणुकीत उतरले तेव्हाच तातडीने दर जाहीरची अपेक्षा होती. आता निवडणूक निकाल जाहीर झाला. आचारसंहिताही संपली तरी कोण पहिल्यांदा दर जाहीर करणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
केंद्र सरकारने उसाच्या बेस उताऱ्याची टक्केवारी तीनवेळा बदलली. उसाचा बेस उतारा ८.५ टक्के होता. त्यानंतर सरकारने तो ९ टक्के उताऱ्यावर बेस आणला. तीन वर्षांपूर्वी तर उतारा बेस टक्का ९.५ टक्क्यावर आणला आहे. केंद्राच्या या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका बसला. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर पाठोपाठ सांगली जिल्हा उताऱ्यांत आघाडीवर आहे. यामुळे चांगला दर अपेक्षित आहे. सध्या ९.५ उताऱ्यास ३ हजार ४५० रुपये दर आहे. साखर कारखान्यांकडून एमएसपी देणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने साखर कारखानदार व काही ऊस दर मागणीच्या नावाखाली आंदोलन करणाऱ्या संघटनांना हाताशी धरून एफआरपी लागू करण्यात आली आहे. जर एमएसपी वर दर जाहीर झाले असते तर सध्या टनाला किमान ४ हजार रुपये प्रतिटन दर मिळाला असता. अद्याप दर जाहीर न झाल्यामुळे सरासरी दर २७०० ते तीन हजार रुपयेच दिला जाईल, अशी चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर कारखान्यांनी दिवाळीला शेतकऱ्यांना काहीच न दिल्याची टीका केली होती.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील निकाला लागला असून पाच ठिकाणी महायुती तर तीन ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. निवडणुकीतील बहुतांश उमेदवार साखर कारखान्यांशी संबंधित असल्याने ऊस हंगामाकडे फारसे लक्ष देता आले नव्हते. हंगाम एक महिना पुढे गेल्याने उसाचा शेतकऱ्यांच्या खर्चातही वाढ झाली आहे. जिल्ह्यात एक लाख ३७ हजार १०३ हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे. आडसाली उसाचा कालावधी जास्त होणार असल्याने वजनातही काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे, तसेच हंगाम एक महिना संपण्यासही उशीर होणार आहे.
जिल्ह्यातील हंगामात १६ कारखान्यांची धुराडी पेटली असून, एक-दोन दिवसांत दोन कारखाने सुरू होतील. अन्य दोन कारखान्यांनी गाळप हंगामाची तयारी केली आहे. जिल्ह्यात ऊसतोड मजूर निवडणुकीच्या अगोदर म्हणजे १३ नोव्हेंबरपासून दाखल झाले आहेत. अद्यापही काही मजूर वाटेत आहेत. पुढील आठ दिवसांत बहुतांश कारखान्यांचा हंगामास गती येणार आहे. यानंतर ऊस लवकर
तुटण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू होणार आहे. यामुळे नोंदीचा ऊस इतर कारखान्यांना जाण्याची शक्यता असल्याने कारखान्यांना उद्दिष्टे गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ऊस दराबाबत सोशल मीडियावरही चर्चा होत आहे. मताचा दर ठरतो मात्र उसाचा दर किती यासारख्या पोस्ट दिसू लागल्या आहेत. साखर उतारा चांगला मिळत असल्याने हंगामात चांगल्या दराची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे, ही अपेक्षा कारखानदार पूर्ण करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
१४ दिवसांत बिल देणे बंधनकारक...
हंगामात ऊस गाळप झाल्यानंतर किमान १४ दिवसांत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात एफआरपी एकरकमी देणे बंधनकारक आहे. तसा नियमही आहे. नियम डावलल्याबद्दल साखर आयुक्तांकडे तक्रारी करूनही केवळ नोटीस देण्याशिवाय काहीही आजवर कारवाई झालेली नाही. किंबहुना एक महिन्यातही अनेक साखर कारखाने पहिले बिल एफआरपी प्रमाणे एकरकमी देत नसल्याची अनेक उदाहरणे आहेत.
ऊस पळवापळवीची शक्यता
विधानसभा निवडणुकीमुळे ऊस हंगाम उशिरा सुरू करण्याची मागणी साखर कारखान्यांकडून केली होती. निवडणुकीच्या तारखेमुळे हंगाम सुरू होण्यास गोंधळामुळे हा ऊस हंगाम तब्बल एक महिना उशिरा सुरू होत आहे. प्रचारादरम्यान कारखान्याच्या हंगामाकडे नेत्यांना लक्ष देता आलेले नाही. यामुळे हंगाम एक महिना उशिरा बंद होणार आहे. घटलेले उसाचे क्षेत्र कमी तसेच वाढलेली कारखान्यांची संख्या यामुळे उसाची पळवापळवी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय कर्नाटक सीमा भागातील कारखाने ८ नोव्हेंबरपूर्वीच सुरू झाले असल्याने त्याचा सांगली जिल्ह्यातील कारखान्यांना फटका बसणार आहे.
जिल्ह्यातील साखर कारखाने...
सहकारी कारखाने (दहा) ः क्रांतिअग्रणी कुंडल, राजारामबापू साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी, तिपेहळ्ळी (जत), हुतात्मा किसन अहिर, सोनहिरा, मोहनराव शिंदे आरग, विश्वासरान नाईक चिखली. खासगी कारखाने (आठ) ः श्री श्रीसद्गुरू, श्री दत्त इंडिया, रायगाव शुगर, यशवंत शुगर खानापूर, दालमिया शुगर, श्रीपती शुगर डफळापूर, उदगिर शुगर, एसईझेड तुरची.