| सांगली समाचार वृत्त |
जत - दि. २८ नोव्हेंबर २०२४
राज्यातील विधानसभेचे निकाल धक्कादायक आणि संशयास्पद आहेत. महायुतीने केंद्रातील सत्तेचा गैरवापर केला आहे. हा निकाल सर्वसामान्यांसह आम्हालाही मान्य नाही. या निवडणुकीत महायुतीने लोकशाहीला काळिमा फासण्याचे काम केले आहे, असा आरोप येथील माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनी केला, तसेच या निकालाच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात येईल, असेही त्यांनी २७ नोव्हेंबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
विक्रमसिंह सावंत पुढे म्हणाले की, महायुतीच्या उमेदवारांना लाखांहून अधिक मते, तर ३६ हजाराहून अधिक मताधिक्य मिळाले आहे. हे सारे संशयास्पद आहे. जत शहरासह तालुक्यातील ६७ गावांत मताधिक्य १०० टक्के मिळणे अपेक्षित असतांना अवघ्या ६ गावांत किरकोळ मताधिक्य मिळाले आहे.
जत विधानसभा मतदारसंघात भूमिपुत्र विरुद्ध उपरा आणि भाजपमधील बंडखोरी अशी तिहेरी लढत झाली होती. सांगली विधानसभा मतदारसंघात ज्याप्रमाणे काँग्रेस मधील बंडखोरी चा फायदा भाजपला झाला तशाच पद्धतीने जत विधानसभा मतदारसंघात भाजपमधील बंडखोरीचा फायदा काँग्रेसचे उमेदवार विक्रम सिंह सावंत होईल अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली होती. प्रत्यक्षात भाजपमधील बंडखोरीचा फायदा विक्रम सिंह सावंत झालाच नाही.