yuva MAharashtra सांगलीच्या स्वच्छतादूतांकडून पंढरपूरच्या चंद्रभागेची स्वच्छता !

सांगलीच्या स्वच्छतादूतांकडून पंढरपूरच्या चंद्रभागेची स्वच्छता !


| सांगली समाचार वृत्त |
पंढरपूर - दि. १८ नोव्हेंबर २०२
कार्तिकी एकादशी निमित्त महाराष्ट्रतील मुख्य देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यातून लाखो वारकरी बांधव पायी चालत पंढरपूर व येथे एकत्र येत असतात. या वारीनंतर पंढरपूर नगरीत मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच प्रत्येक आषाढी व कार्तिकी वारीनंतर सांगली शहरातील निर्धार फौडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डुणावर यांच्या पुढाकाराने मोठ्या संख्येने युवक स्वच्छतेची सेवा बजवण्यासाठी पंढरपूर न येथे दाखल होत असतात.

यंदाच्या कार्तिकी वारीनंतर सांगली शहरातून १०० युवकांची स्वच्छता वारी पंढरपूरकडे बेळगावचे आमदार अभय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गस्थ झाली... पंढरपूर चंद्रभागेच्या तीरी युवकांनी सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत श्रमदान करीत देवाचे फोटो, हार-तुरे, कपडे व अन्य कचरा असे जवळपास पाच टन निर्माल्य व कचरा संकलन केले. यासाठी पंढरपूर नगरपालिकेने एक जेसीबी व डंपर दिले होते. यंदाच्या वारीसाठी क्रीडाई पंढरपूर व सांगली, रावसाहेब पाटील, सुरेश पाटील, योगेश कापसे, विनायक शेटे, जयराज सागरे, नारायण उंटवाले आदींनी बस, जेवण, नाष्टा, टी-शर्ट यासाठी सहकार्य केले.


आमदार अभय पाटील म्हणाले की, सांगली शहरात राकेश दड्डणावर सारखे युवक स्वच्छतेसाठी झोकून देऊन काम करतात हे बघून आनंद झाला. आम्ही राजकारणी काम करणं यात काही विशेष नाही, परंतु अशी तरुणाई कोणत्याही अपेक्षाविना एवढं मोठं काम उभा करते हे खरंच कौतुकास्पद आहे आणि फक्त सांगलीतच नाही पंढरपूर व अनेक ठिकाणी त्यांची स्वच्छता चालते. या स्वच्छतेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.

राकेश दड्डुणावर म्हणाले की. यंदाच्या वारीत आम्हाला मागील वेळेपेक्षा अधिक प्रमाणात अस्वच्छता दिसून आली. याचं कारण सर्व शासकीय यंत्रणा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये गुंतलेली आहे आणि याचा परिणाम पंढरपूर येथील वारीच्या नियोजनात दिसून आला. त्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात काम करण्याचा वाव मिळाला आणि आम्ही चंद्रभागा नदीचा बहुतांश भागाचा कायापालट करू शकलो. यंदाच्या वारीत एक आशावादी गोष्ट अशी घडली की, स्थानिक लोकराज्य फाउंडेशन, पंढरपूर क्रीडाई सह स्थानिक नागरिकांनी सहभाग नोंदविला.

यावेळी लक्ष्मण रणदिवे, अजित खिलारे, अनिरुद्ध कुंभार, सतिश कट्टीमणी, रोहित मोरे, ज्ञानदेव सुतार यांच्यासह अन्य स्वच्छतादूतांनी श्रमदानात सहभाग नोंदविला होता.