yuva MAharashtra दक्षिण भारत जैन सभेचा विस्तार करणार - भालचंद्र पाटील : आजीव सभासद नोंदणी प्रक्रियेला सुरवात !

दक्षिण भारत जैन सभेचा विस्तार करणार - भालचंद्र पाटील : आजीव सभासद नोंदणी प्रक्रियेला सुरवात !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० नोव्हेंबर २०२
''दिगंबर जैन समाजाची शिखर संस्था असलेल्या दक्षिण भारत जैन सभेने महाराष्‍ट्र, कर्नाटकात विस्तार करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी आजीव सभासद नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. शिक्षण आणि आरोग्य या दोन प्रमुख गोष्टी केंद्रस्थानी ठेवून सभेची भविष्यातील वाटचाल समाजाला विकासाच्या दिशेने नेण्याची असेल,'' असा विश्वास प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या निवेदनात अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे.

दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील-बोरगावकर यांच्या निधनानंतर भालचंद्र पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे आली असून त्यांनी पारंपरिक पद्धतीने सभेचे काम पुढे न नेता समाजाची गरज, समाजापुढील प्रश्न आणि तरुणांच्या हाताला काम, आरोग्य संवर्धन या गोष्टींना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा निश्चय केला. होतकरू तरुणांना उच्च शिक्षणासाठी संपूर्ण सहकार्याचे धोरण आता सभेने राबवण्याचे ठरवले आहे. 


याबाबत एका निवेदनाद्वारे माहिती देताना श्री. पाटील म्हटले आहे की, ''जैन समाजाचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र स्तवनिधी येथे दक्षिण भारत जैन सभेची १२५ वर्षांपूर्वी स्थापना झाली. सभेमुळे जैन समाज शिकला, प्रबोधित झाला, प्रगतिपथावर आरूढ झाला. संघटनेत आतापर्यंत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले. दिगंबर जैन समाजातील असंख्य युवक, युवती, ज्येष्ठ नागरिकांनी सभा मजबूत केली. या पुढील काळात जैन समाजासमोरील आव्हाने वेगळी आहेत. शेती हे बलस्थान असले तरी त्यावर अवलंबून राहण्याची परिस्थिती नाही. उद्योग, व्यापार, शिक्षणातून विकासाला पर्याय नाही. हे आव्हान पेलण्याची क्षमता समाजात निर्माण करणे, समाजाला मार्गदर्शन व सहकार्य करून राष्ट्रीय प्रवाहात आणणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दक्षिण भारत जैन सभेचा कार्यविस्तार व सभासद संख्या वाढवण्याचे निश्चित केले आहे. दिगंबर जैन समाजातील सर्व पोटजातींनी सभेचे सभासद व्हावे. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या तरुणांनी आजीव सभासद होऊन आपले योगदान द्यावे.'' असे श्री. भालचंद्र पाटील यांनी या निवेदनात म्हटले आहे.