| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ नोव्हेंबर २०२४
स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब आणि स्व. मदनभाऊ पाटील यांच्या अकस्मित निधनाने सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची जबाबदारी माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत तथा बाळासाहेब कदम यांच्या खांद्यावर येऊन पडली. राजकारणाचे बाळकडू प्यायलेले बाळासाहेब जिल्ह्यात हळूहळू पाय रोवू लागले... याला खऱ्या अर्थाने बळ मिळाले ते चारच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने...
सांगली लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती मोठ्या कौशल्याने आणि कसलेल्या राजकारणाप्रमाणे हाताळत असताना आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी ज्या काही चाली खेळल्या त्यामुळे विशाल पाटील यांचा विजय सुखकर झाल्याचे साऱ्या जिल्ह्यासह महाराष्ट्राने अनुभवले. याच निवडणुकीत 'सांगली पॅटर्न'... आणि 'आमचं ठरलंय वार फिरलंय'... या दोन वाक्याभोवती ही निवडणूक रंगत गेली... परंतु आता विधानसभा निवडणुकीत हाच 'सांगली पॅटर्न' आणि लोकसभेत फिरलेलं वारं वादळ बनून या दोन नेत्यांच्या भोवती पिंगा घालत आहे...
सांगली लोकसभा निवडणुकीत श्रीमती जयश्रीताई पाटील या बंडखोरीवर ठाम आहेत. या नेत्यांनी दोन वेळा केलेली शिष्टाई येथे कामी आली नाही. त्यामुळे येथे आ. डॉ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांच्यासमोर धर्मसंकट उभे राहिले आहे. श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्याशी असलेलं नातं की पक्ष निष्ठा असा प्रश्न खा. विशाल पाटील यांच्यापेक्षा आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्यासमोर अधिक मोठ्या प्रमाणात उभा ठाकला आहे.. श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी कालच खा. विशाल पाटील हे आपल्या पाठीशी असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. परंतु अद्याप खा. विशाल पाटील यांनी आपले पत्ते उघड केले नाहीत.
दुसऱ्या बाजूला श्रीमती जयश्रीताई पाटील यांची समजूत काढण्यासाठी विजय बंगल्यावर गेलेले आ. डॉ. विश्वजीत कदम हे सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या बंगल्यावर पोहोचले आणि त्यानंतरच आ. डॉ. कदम हे पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे संकेत दिले गेले. परंतु त्यांच्यासमोरही नातं की पक्ष हे धर्मसंकट उभे टाकले आहे. कारण त्यांचे चुलत बंधू, ज्यांच्या खांद्यावर सध्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील जबाबदारी देण्यात आली आहे, ते जितेश कदम हे जयश्रीताईंचे जावई... त्यामुळे हे नातंच पक्ष निष्ठेच्या आड तर येणार नाही ना ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
जी गोष्ट सांगली विधानसभा मतदारसंघातील तीच थोड्या फार फरकाने मिरज विधानसभा मतदारसंघातील. पण ती आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्यापेक्षा खा. विशाल पाटील यांच्या दृष्टीने अधिक तिढ्याची ठरत आहे. मिरज विधानसभा मतदारसंघ हा मुंबईतील तहात उबाठाच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळे महाआघाडीचा धर्म पाळायचा तर लोकसभेला ज्यांनी प्रामाणिकपणे मदत केली, त्यांच्या विरोधात उभे राहावे लागणार आहे. प्रश्न केवळ येथील विधानसभेचाच नाही तर भविष्यात होऊ घातलेल्या सांगली महापालिका निवडणुकीचाही आहे. त्यामुळे येथे जर अप्रत्यक्षपणे 'सांगली पॅटर्न' राबविण्याचा निर्णय झाला, तर जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या उमेदवारांना ते धोक्याचे ठरू शकते. पुढे जाऊन सांगली महापालिका निवडणुकीतही दगा फटका होऊन महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवला जाऊ शकतो.
शेजारील तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातही आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्यापुढे मोठे प्रश्नचिन्ह आहे ते ज्यांच्याशी मैत्री जपली, ज्यांनी स्व. डॉ. पतंगराव कदम यांना मोलाची साथ दिली त्या स्व. अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांच्या पाठीशी राहायचे की आघाडी धर्म म्हणून वैभव पाटील यांना साथ द्यायची ? असा प्रश्न आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्याप्रमाणेच खा. विशाल पाटील यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
अगदी तशीच परिस्थिती जत विधानसभा मतदारसंघातही आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी सर्वात प्रथम विशाल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, ते भाजपाचे नेते श्री. विलासराव जगताप... आता श्री. जगताप स्वतः निवडणूक रिंगणात नसले, तरी ते रवी तमनगौडा पाटील यांच्या पाठीशी उभे आहेत. याच मतदारसंघात आ. डॉ. विश्वजीत कदम यांचे नातेवाईक, सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे आहेत. आता ज्यांची लोकसभा निवडणुकीत मदत घेतली त्या विलासराव जगताप गटाशी गट्टी करायची, की नात्यासाठी आणि पक्षनेतेसाठी पैरा फेडण्यापासून विन्मुख व्हायचं ? असा प्रश्न या दोन्ही नेत्यांसमोर उभा टाकला आहे.
त्यामुळे भविष्यातील जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व समर्थपणे पेलायचे असेल तर, आ. डॉ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील हे कोणता आणि कसा मार्ग काढतात यावरच पुढील सारी गणिते अवलंबून आहेत... सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या निवडणुकीत 'सांगली पॅटर्न'... आणि 'आमचं ठरलंय वार फिरलंय'... या दोन वाक्याभोवती फिरलेली लोकसभा निवडणूक, विधानसभेत काय रंग दाखवते हे पाहणंही आवश्यक ठरणार आहे.