| सांगली समाचार वृत्त |
वाळवा - दि. २५ नोव्हेंबर २०२४
फळबाग लागवडीचे क्षेत्र महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर वाढत असून यामध्ये प्रत्येक वर्षागणिक वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे व त्यातल्या त्यात उच्चशिक्षित तरुण आता शेतीत येऊ लागल्याने मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवडीकडे कल असल्याचे दिसून येते व त्याचाच हा परिणाम आहे. नैसर्गिक आपत्ती तसेच पडलेले बाजारभाव यामुळे पारंपारिक शेती व पारंपारिक पिकांच्या लागवडीला शेतकऱ्यांनी आता फाटा देत आधुनिक शेती पद्धत अवलंबली असून वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीतून आर्थिक उन्नती साधताना आपल्याला दिसून येत आहेत.
अगदी याच पद्धतीने जर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते व उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. कारण त्या ठिकाणी असलेले मुबलक पाणी हे ऊस शेतीसाठी फायदेशीर ठरते. परंतु गेल्या काही वर्षापासून ऊस शेतीने देखील शेतकऱ्यांना आर्थिक फटका दिला असल्याने या पट्ट्यातील शेतकरी देखील आता आधुनिक शेतीकडे विशेष लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे.
अगदी याच पद्धतीने जर आपण सांगली जिल्ह्यात असलेल्या वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील प्रगतिशील शेतकरी उदय पाटील यांची यशोगाथा बघितली तर त्यांनी ऊस शेती सोडून गेल्या पाच वर्षापासून पेरू लागवड करून त्यामध्ये सगळं लक्ष केंद्रित केलेले आहे. दीड एकर पेरूची बाग त्यांनी लावली आहे व त्यातून ते वर्षाला लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत.
कधीपासून केली पेरू शेतीला सुरुवात ?
उदय पाटील यांनी साधारणपणे 2000 मध्ये शेती करायला सुरुवात केली. त्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतीमध्ये ते नेहमीच अनेक नवनवीन प्रकारचे प्रयोग करत असतात. अभ्यासू वृत्ती असल्यामुळे शेतीमध्ये आधुनिक पद्धती अवलंबण्याची त्यांची आवड असून त्याच आवडीतून त्यांनी 2018 मध्ये प्रयोग म्हणून पेरूची लागवड करायला सुरुवात केली व दीड एकर जागेमध्ये पेरूची व्हीएनआर थायलंड या जातीची लागवड केली.
लागवड केल्यानंतर साधारणपणे 18 महिन्यांपर्यंत योग्य व्यवस्थापन आणि काळजी घेण्यावर त्यांनी भर दिला. इतकेच नाही तर या पेरूच्या बागेमध्ये त्यांनी शेवंती सारखे फुल पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव केला व त्या माध्यमातून देखील त्यांनी चांगला नफा मिळवला. या पेरूची अठरा महिने चांगली देखभाल केल्यानंतर त्यांना पहिल्या वर्षी 15 टन पेरूचे उत्पादन मिळाले व त्यांचा हा पेरू शेतीचा प्रयोग जवळपास यशस्वी झाला.
अशा पद्धतीने त्यांनी प्रत्येक वर्षी हा प्रयोग यशस्वी केला आणि चांगल्या प्रकारे व्यवस्थापन ठेवून पेरूच्या बागेतून दरवर्षी आंतर पिकांच्या माध्यमातून आणि पेरूची साधारणपणे दोनदा काढणी करून सरासरी 35 टन उत्पादन मिळवण्यात ते यशस्वी झाले. व्यवस्थापन नीटनेटके ठेवल्याने पेरूचे उत्पादन देखील दर्जेदार मिळाल्याने ते त्याची निर्यात देखील करत आहेत. अशाप्रकारे दहा ते पंधरा लाखापर्यंतचे उत्पन्न ते एका वर्षात या दीड एकरमधून मिळवताना दिसून येत आहेत.