| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. १० नोव्हेंबर २०२४
मिरज सुधारसाठी कायम पालकमंत्री ना. सुरेशभाऊ खाडे यांच्याशी संघर्षाची पवित्रा घेणाऱ्या मिरज सुधार समितीने मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार पालकमंंत्री सुरेशभाऊ खाडे यांना जाहीर पाठिंबा दिल्याची माहिती मिरज सुधार समितीचे अॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी यांनी पत्रकार परिेषदेत दिली. यावेळी माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी हे उपस्थित होते. मिरज सुधार समितीच्या या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शनिवारी मिरज सुधार समितीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अॅड. ए. ए. काझी म्हणाले की, पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याशी विकासात्मक मुद्यावर मिरज सुधार समिती कायम संघर्षाची भूमिका घेत असे. ना. खाडेंनी सुध्दा सुधार समितीच्या सूचना मान्य केल्या आहेत. ना. खाडे आणि मिरज सुधार समिती या दोघांचा हेतू शहराचा विकास आहे. पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज शहरासह ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला, हे कोणीच नाकारत नाही, असे यावेळी बोलताना ॲड. काझी म्हणाले.
मिरज शहरासंदर्भात बोलायचे झाले तर, शहरासाठीसुध्दा मोठा निधी ना. सुरेशभाऊ खाडेंनी आणला. मात्र, तथाकथित मिरज पॅटर्नमुळे त्या निधीचा विनियोग झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. याला केवळ पालकमंत्रीच जबाबदार आहे, असे म्हणणे संकुचित ठरेल. आता तथाकथित मिरज पॅटर्नचे त्रांगडे झाल्यामुळे येत्या पाच वर्षात ना.सुरेशभाऊ खाडे मिरज शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावतील, अशी आशा आहे.
मिरज शहरातील प्रलंबित असलेल्या प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, मिरज-सांगली रस्त्याचे सहापदरीकरण, भाजी मंडई, मटण मंडईसह अन्य विधायक विकास कामांसाठी आवश्यक निधी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडेच आणू शकतात. त्यामुळे सुरेशभाऊ खाडेंंसारख्या जेष्ठ अनुभवी लोकप्रतिनिधी विधिमंडळात असणे आवश्यक आहे. म्हणून मिरज सुधार समितीने जाहीर पाठिंबा दिले असल्याचे अध्यक्ष असिफ निपाणीकर यांनी स्पष्ट केले. यावेळी उपाध्यक्ष राकेश तामगावे, नरेश सातपुते, राजेंद्र झेंडे, सलीम खतीब, संतोष जेडगे, अभिजीत दाणेकर, जावेद शरिकमसलत, रविंंद्र बनसोडे, वसीम सय्यद आदी सदस्य उपस्थित होते.