| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ नोव्हेंबर २०२४
गेले पंधरा दिवस निवडणुकीच्या धामधुमीचे होते. त्यामुळे असेल कदाचित, पण त्या आठवड्यातील तीन विशेष आणि भारतीय म्हणून अभिमान वाटावा अश्या गोष्टी फारशा प्रकाशात आल्या नाहीत.
१ नवा पाम्बन रेल्वे पूल !
दक्षिणेतील रामेश्वरम हे समुद्रातील पाम्बन बेटावर आहे. या बेटापासून मुख्य भूमीवरील जवळचे शहर मंडपम. मंडपम आणि पाम्बन याला जोडणारा २.०७ किलोमीटर लांबीचा नवा पूल बांधण्यात आला आहे. त्याच्या चाचणीसाठी सप्टेंबर, २०२४ पासून विनाप्रवासी रेल्वे नेत आहेत. गेल्या आठवड्यात पुलाची अंतिम चाचणी रेल्वे ताशी ८० किलोमीटर वेगाने नेऊन झाली.
या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे या रेल्वे मार्गात 'Vertical Lift Segment' बसवण्यात आला आहे. म्हणजे रेल्वे रुळांपैकी मधला एक २७६ फूट लांबीचा भाग, लिफ्ट एका सरळ रेषेत वर जावी तसा वर सुमारे ३५ फूट उचलला जातो. पुलाचा हा भाग असा वर उचलल्याने त्या भागातून ७२ फूट उंचीची जहाजे जाऊ शकतात. ज्यावेळी रुळाचा हा भाग खाली रुळाच्या पातळीत असतो त्यावेळी तो समुद्राच्या पाण्यापासून ४१ फूट वर असतो. व्हर्टिकल लिफ्ट हे तंत्र भारतात प्रथमच वापरण्यात आले आहे.
२ हायपर सोनिक मिसाईल !
रविवार, १७ नोव्हेंबर रोजी पूर्ण स्वदेशी निर्मित हायपर सोनिक मिसाईलची चाचणी सैन्य दलाने यशस्वीपणे घेतली. ध्वनीपेक्षा पाचपट किंवा अधिक वेगाने जाणाऱ्या क्षेपणास्त्रास हायपर सोनीक म्हटले जाते. आता भारताने चाचणी घेतली ते क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा सहा पट जास्त वेगाने, म्हणजे मॅक-६ वेगाने जाणारे आहे. हा वेग सेकंदाला २ किलोमीटर इतका प्रचंड आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला १,५०० किलोमीटर लांबपर्यंतचे लक्ष वेधणारा आहे. वेग आणि कमीत कमी उंचीवरून जाण्याची क्षमता यामुळे ते रडार आणि प्रतिहल्ला यापासून अधिक सुरक्षित राहते. याला क्रॅमजेट इंजिन वापरल्याने इतक्या वेगातही ते गरज भासल्यास झटकन वळु शकते. ही पूर्ण निर्मिती भारताच्या डीआरडीओ या संस्थेने केली आहे.
३ इस्रोने आपला आजपर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह प्रक्षेपित !
१९ आणि २० नोव्हेंबरच्या मध्यरात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी इस्रोने आपला सर्वात वजनदार ४,७०० किलो वजनाचा उपग्रह अमेरिकेतून स्पेस-एक्सच्या रॉकेटद्वारे प्रक्षेपित केला. दळणवळण आणि अन्य कारणासाठी वापरला जाणारा हा Gsat-20 उपग्रह स्पेस-एक्सच्या फाल्कन-९ या रॉकेटने प्रक्षेपित झाला. भारताचे सर्वाधिक ताकतवर रॉकेट LVM-3, ज्याला फॅट बॉय किंवा बाहुबली असेही म्हणतात त्याची क्षमता ४,००० किलोची आहे. Gsat-20 त्याहून वजनदार ४,७०० किलोचा झाल्याने तो प्रक्षेपित करण्यासाठी स्पेस-एक्सची मदत घ्यावी लागली.
इस्रो NGLV हे नवे शक्तिशाली रॉकेट बनवण्याच्या मार्गावर आहे. त्याची क्षमता ३०,००० किलोपर्यंत वजनाचे उपग्रह कमी उंचीवर सोडण्याची असेल.
गेल्या आठवड्यातील या तिन्ही घटना प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाच्या आहेत.