yuva MAharashtra महाविकास आघाडीचा जाहिरनामा हा जनकल्याणकारी महाराष्ट्रनामा - पृथ्वीराज पाटील

महाविकास आघाडीचा जाहिरनामा हा जनकल्याणकारी महाराष्ट्रनामा - पृथ्वीराज पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ नोव्हेंबर २०२
महाविकास आघाडीचा जाहीरनामा म्हणजे महाराष्ट्रनामा आज काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीर केला. यावेळी प्रांताध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार संचय राऊत, खासदार वंदना चव्हाण, खा. मनु संघवी उपस्थित होते. त्याचे थेट प्रक्षेपण सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. महाराष्ट्रनाम्यात राज्यातील शिक्षण, शेतकरी, आरोग्य, उद्योग व्यवसाय, सामाजिक न्याय, महिला उन्नती, युवक कल्याण, जुनी पेन्शन योजना व इतर अनेक कल्याणकारी योजना देण्यात आल्या आहेत. या जाहीरनाम्याला महाराष्ट्रनामा असं नाव देण्यात आलं आहे, असे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. 

यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील पुढे म्हणाले, 
महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना ३ हजार रुपये दर महिन्याला देण्यात येणार आहेत. महिलांना बस प्रवास मोफत असणार आहे. ५०० रुपयांमध्ये ६ सिलेंडर देणार येणार आहेत. महिला व मुलींसाठी निर्भय महाराष्ट्र धोरण आखण्यात येईल. मुलींसाठी मोफत सर्व्हायकल कॅन्सर लस, मासिक पाळीच्या दिवसात 2 दिवस ऐच्छिक रजा, बचत गट सक्षमीकरणासाठी स्वतंत्र विभाग, स्वतंत्र बालकल्याण मंत्रालय स्थापन करणार येणार आहे. प्रत्येक मुलीला १८ वर्षानंतर १ लाख रुपये देणार आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाआघाडी अधिक सजग आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफ करणार आहोत. नियमित कर्जफेडीस पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर सूट देण्यात येईल. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करणार. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा, मुलांना सुविधा देण्यासाठी आढावा घेऊन लागू योजनांमध्ये सुधारणा करणार आहे. शेतकऱ्यांना हमी भावमिळवून देण्यासाठी वचनबद्ध राहणार, तसेच पीकविम्याच्या जाचक अटी काढून विमा योजना सुलभ करणार आहोत.

तरुण पदवीधर व पदविकाधारक सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ४ हजार रुपयांपर्यंत भत्ता देणार आहे. राज्य सरकारच्या अडीच लाख जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू करणार असून युवकांच्या कल्याणासाठी ‘युवा आयोगा’ची स्थापना करणार आहे. ‘बार्टी’, ‘महाज्योती ’ आणि ‘सारथी’मार्फत देण्यात येणारा शिष्यवृत्तीचा निधी वाढविणार आहे. ‘एमपीएससी’ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणार आणि निकालदेखील 45 दिवसांत जाहीर करणार आहे. ‘एमपीएससी’च्या सर्व परीक्षा देण्यासाठी एकदाच शुल्क आकारून युनिफाईड स्मार्ट कार्ड देणार, ज्याआधारे विद्यार्थ्यांना वर्षभरातील सर्व शासकीय परीक्षा देता येणार आहे.


उद्योग व्यवसाय, नवे औद्योगिक धोरण आखणार, महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देणार
राज्यात सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार आहे.

महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार
अनुसूचित जाती व आदिवासी विभागांचे हक्काचे बजेट निर्धारित कालमर्यादेत खर्च होण्यासाठी कायदा करणार आहे.

विविध समाजघटकांसाठी जाहीर झालेल्या सर्व नव्या महामंडळांना प्रत्येकी शंभर कोटी रुपयांचा प्रारंभिक निधी तातडीने देणार आहे.

संघटित व असंघटित सफाई कामगारांसाठी कल्याण महामंडळ स्थापन करणार आहे. ‘संजय गांधी निराधार योजने ’साठीची उत्पन्न मर्यादा २१ हजारांवरून वाढवून ५० हजार रुपये करणार. योजनेच्या लाभाची रक्कम दीड हजारांवरून वाढवून दोन हजार रुपये करणार आहे.

विधवा, परित्यक्ता, वृद्ध यांच्यासाठीच्या संजय गांधी निराधार, श्रावण बाळ इत्यादी सर्व योजनांचे सुसूत्रीकरण करणार आहे. जनतेच्या हितासाठी जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पावले उचलणार आहेत.

दरमहा वीजवापर तीनशे युनिटपर्यंत असणाऱ्या ग्राहकांचे शंभर युनिटपर्यंतचे वीजबिल दरमहा माफ करणार आहे. वीजग्राहकांचा विरोध लक्षात घेऊन प्रीपेड मीटर्स योजनेचा आढावा घेणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार आहे.

वृद्ध कलावंतांचे मानधन वाढविणार, शिवभोजन थाळी योजना केंद्रांची संख्या वाढविणार आहे.

शहरीकरणाचे आव्हान पेलण्यासाठी आणि त्याला योग्य दिशा देण्यासाठी ‘राज्य नागरी आयोग’ स्थापन करणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार, या निवडणुका एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेणार आहे.

राज्य सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी ‘राज्य सल्लागार मंडळा’ची स्थापना करणार आहे.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच वरीलप्रमाणे योजनांची अंमलबजावणी तातडीने सुरु होणार आहे. यासाठी सांगलीकर मतदारांना हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी मला निवडून देऊन महाराष्ट्रनाम्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी काँग्रेस व महाविकास आघाडीचे हात बळकट करावे असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.