| सांगली समाचार वृत्त |
आटपाडी - दि. १२ नोव्हेंबर २०२४
दिघंची ते आटपाडी रस्त्यावरील कारखाना फाटा परिसरात चारचाकीतून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गुटखा आणि चारचाकी असा ११ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नवाज बादशाह मुलाणी (वय २५, रा. एकतपूर रस्ता, बनकर वस्ती, सांगोला, जि. सोलापूर) आणि जुबेर जमीर मुलाणी (२२ रा. एकतपूर रस्ता, पुजारवाडी सांगोला) अशी संशयितांची नावे आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केली.
याबाबत अधिक माहिती अशी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषणने विशेष पथक स्थापन करुन गुटख्याची विक्री, वाहतूक आणि साठा करणाऱ्यांवर कारवाईची मोहिम सुरु केली आहे. पथकास दिघंची ते आटपाडी रस्त्यावरील कारखाना फाटा येथे एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकीतून (क्र. एमएच ४५ एएफ ४५०२) गुटख्याची वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला. याच दरम्यान सदर मार्गावरून ही कार येताना दिसली, ती थांबविल्यावर पोलिसांनी तपासणी केली. त्यावेळी त्यामध्ये सुगंधी सुपारी, तंबाखू, पानमसाला, गुटखा असा मुद्देमाल आढळून आला. राज्य सरकारने गुटखा आणि सुगंधी तंबाखू यांना प्रतिबंधीत माल म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस चौकशीत जप्त केलेला मुद्देमाल सांगोला येथील अभिजीत मस्के याच्याकडून आणला असल्याची माहिती संशयितांनी दिली. अटक करण्यात आलेले दोन्ही संशयित हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर सांगोला पोलीस ठाण्यात गुटखा वाहतुकीचे गुन्हे दाखल आहेत. सदरच्या कारवाईत पोलीस निरिक्षक सतीश शिंदे, सहा. पोलीस निरिक्षक सिकंदर वर्धन, पोलीस कर्मचारी संजय पाटील, सूर्यकांत साळुंखे, हणमंत लोहार, प्रमोद साखरपे, आदींनी सहभाग घेतला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर संपूर्ण राज्यात नाकाबंदी करण्यात येत असून मद्य, गुटखा, सुगंधी सुपारी अशा अवैद्य वस्तूंबरोबरच बेनामी रक्कम जप्त करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्यानंतर. जिल्ह्यांच्या सीमेवर सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या पंधरवड्याच्या कालावधीत कोट्यावधी रुपयांची रक्कम व सुगंधी सुपारी, गुटखा, मद्य इत्यादी वस्तू मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या आहेत.