| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २५ नोव्हेंबर २०२४
महाआघाडीच्या सरकारला धोबीपछाड देत शिंदे-फडणवीस युतीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं. त्यानंतर शरद पवारांची साथ सोडत अजित पवार हे या सरकारात सहभागी झाल्यानंतर युतीची महायुती झाली. अनेक आव्हानाला तोंड देत महायुतीला आपला कार्यकाल पूर्ण केला आणि अनेक लोकप्रिय योजनांच्या जोरावर मतदाराना आकर्षित केलं. या सर्वात मोठी गेम चेंजर ठरली ती 'लाडकी बहीण'... आणि आता पुन्हा एकदा "महायुती -२" सरकार पुढील वाटचालीसाठी तयार होत आहे.
दरम्यान यावर भाजप नेते आणि मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा आमच्या एकजुटीचा विजय आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीनं आम्हाला ठरवून टार्गेट केलं, जेव्हा एखाद्याला ठरवून टार्गेट केलं जातं तेव्हा ते लोकांच्या लक्षात येतं. त्यामुळे मतदार आमच्या बाजुनं राहिले. यावेळी विरोधकांनी पुन्हा एकदा फेक नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी त्यांचा प्रयत्न फसला. आम्ही अधुनिक अभिमन्यू आहोत, चक्रव्यूह तोडून दाखवला असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आमच्या पक्षानं आमच्या कार्यकर्त्यांनी केवळ भाजपसाठी काम केलं नाही तर महायुतीमध्ये जेवढे मित्र पक्ष होते, त्यांच्या उमेदवारांसाठी देखील काम केलं. हा आमच्या एकजुटीचा विजय आहे. लाडक्या बहिणींचे विशेष आभार मानतो. मी महाराष्ट्राच्या जनतेपुढे नतमस्तक आहे. मराठा आणि ओबीसी समाज हा पहिल्यापासून आमच्या पाठिशी आहे, होता आणि राहील. जेपी नड्डा आणि अमित शाह यांचे आभार मानतो. या निकालानं पुन्हा एकदा सिद्ध केलं की राज्यातील जनता ही महाराष्ट्राच्या पाठिशी आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.