| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ नोव्हेंबर २०२४
गेले दोन दिवस विविध माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबतचा जीआर ही निघाला असल्याची बातमी व्हायरल होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात महायुतीकडून वक्फ बोर्ड बाबत जो प्रचार केला किंवा विरोधी भूमिका घेतली ती खोटी होती की काय अशी शंका निर्माण झाली होती. मात्र आता भाजपाकडून या व्हायरल बातमी बाबत खुलासा करण्यात आला आहे.
वक्फ बोर्डला दिलेल्या निधीवर आता भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खुलासा केला आहे. त्यांनी सोशल मिडिया एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, वफ्क बोर्डाला निधी दिल्याची बातमी सध्या सुरू आहे. सध्या महाराष्ट्रात काळजीवाहू सरकार आहे व या सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. फक्त तातडीने काही आपत्कालीन निर्णय करावे लागले तरच करता येतात.
निधी बाबतचा निर्णय प्रशासकीय पातळीवरून घेतला गेला आहे की काय हे तपासून पाहायला हवं. मात्र प्रशासन आपल्या निर्णयात दुरुस्ती करेल अशी आशा आहे, असंही उपाध्ये म्हणाले.
सध्याच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या गोंधळात वरील बातमीचा गोंधळ, महाराष्ट्र वासियांच्या मनात शंकेचा गोंधळ वाढवून गेला हे मात्र खरे. जर काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी अथवा प्रशासनाने ही याबाबतचा निर्णय घेतलेला नसेल, तर ही बातमी कोणी व कोणत्या आधारे प्रसिद्ध केले याचा शोध आंब्याची आवश्यकता आहे.