yuva MAharashtra सांगलीत आयुर्वेद व आधुनिक फार्मसीचा समन्वय साधणाऱ्या पाच आयुर्वेदिक उत्पादनांचे उदघाटन !

सांगलीत आयुर्वेद व आधुनिक फार्मसीचा समन्वय साधणाऱ्या पाच आयुर्वेदिक उत्पादनांचे उदघाटन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ नोव्हेंबर २०२
येथील वसंतदादा पाटील आयुर्वेद महाविद्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली पाच आयुर्वेदिक उत्पादने व आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने बाजारात आणलेली ही उत्पादने आज भव्य समारंभात सादर करण्यात आली. यामध्ये अडुळसादी सिरप, केश्या तैल, पेनोसिल क्रीम, तर्पीन कापूर ऑईल आणि गंधर्व हरितकी चूर्ण वटी या पाच उत्पादनांचा समावेश आहे.

ही आगळीवेगळी संकल्पना साकार करण्यामागे संचालक सागर बिरनाळे यांचे दूरदृष्टीचे मार्गदर्शन आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर असलेला त्यांचा दृढ विश्वास व त्यांचे प्रोत्साहन या सहकार्य पूर्ण उपक्रमाचे मूळ आहे. ही घटना विद्यार्थ्यांना संशोधन, नाविन्य आणि नेतृत्वाच्या संधी पुरवण्याचा श्री. बिरनाळे यांचा दृष्टिकोन अधोरेखित करते. आयुर्वेदाच्या परंपरेला आधुनिक फार्मसीच्या व्यवहारिक दृष्टिकोनाशी जोडून एक नवा आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम आहे. यामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक वाढीचे नवीन मार्ग उघडत असून त्यांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील अनुभव आणि परंपरा व विज्ञान यामधील समन्वयाची अनुभूती मिळत आहे.


आयुर्वेद ही 'जीवनाचे शास्त्र' म्हणून प्रसिद्ध असलेली परंपरा शारीरिक, मानसिक आणि आत्मिक पोषणासाठी अनेक शतकापासून प्रभावी उपाय प्रदान करत आली आहे. याच दृष्टीकोनाचा गौरव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोडोलीच्या यशवंत आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद गोडबोले यांनी यावेळी अधोरेखित केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वसंतराव बंडुजी पाटील ट्रस्ट सांगलीचे अध्यक्ष समीर बिरनाळे होते. या भव्य समारंभात वसंतराव बंडूजी पाटील ट्रस्टचे संचालक सागर बिरनाळे, आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी सांगलीचे प्राचार्य डॉ. एस. ए. तांबोळी, वसंतदादा पाटील आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वजीत म्हेत्रे, विविध निमंत्रित डॉक्टर, संस्थेचे माजी विद्यार्थी, फार्मासिस्ट, दोन्ही महाविद्यालयाचे विभाग प्रमुख व प्राध्यापक मंडळी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन डिप्लोमा विभागाचे प्रमुख श्री. अमोल पाटील यांनी केले संतोष यादव यांनी त्यांना सहकार्य केले.