| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २२ नोव्हेंबर २०२४
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर लागलीच या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचे कल यायला सुरूवात झाली. विविध संस्थांच्या एक्झिट पोलच्या भाकितांचा पोळा फुटला आहे. 288 जागांवर मतदार राजाने कुणाच्या पदरात भरभरून मतदान केले याची गणित मांडण्यात आली. सट्टा बाजारात सुद्धा वातावरण तापले आहे. बाजाराच्या भाकिताने अनेक दिग्गजांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 23 नोव्हेंबर रोजी कुणाला बहुमत मिळणार, कोणत्या पक्षांचे सरकार येणार हे स्पष्ट होईल. पण त्यापूर्वीच या अंदाजांनी अनेकांना धक्का दिला आहे.
सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Exit Poll शिवाय राज्यात सट्टा बाजाराला सुद्धा विधानसभा निवडणुकीचा रंग चढला आहे. सट्टा बाजाराकडे पण अनेकांचे लक्ष लागले होते. फलोदी सट्टा बाजाराच्या आकडेवारीनुसार, राज्यात भारतीय जनता पक्षाला मोटे यश मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. राज्यात भाजपाला 90 ते 95 जागा मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेना शिंदे गटाला किती जागा?
भाजपासोबत मित्र पक्ष शिवसेना शिंदे गट सुद्धा सत्तेत आहे. शिंदे गटाला राज्यात 36 ते 40 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर महायुतीत सहभागी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाला सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार, 12 ते 16 जागांवर विजयाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार, राज्यात महायुती 142-151 जागा काबीज करेल आणि पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत येईल.
बीकानेर, महादेव ऑनलाईनचा कौल सांगतो काय?
फलोदी सट्टा बाजारच नाही तर बीकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाईन सट्टा बाजाराने पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील विजयाचा अंदाज वर्तवला आहे. या दोन्ही सट्टा बाजारांनी महायुतीवर शिक्कामोर्तब केले आहे. पण या दोन्ही सट्टा बाजारांनी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँटे की टक्कर असेल असा दावा केला आहे. दोन्ही गटात अत्यंत कमी फरक असेल. त्यामुळे राज्यात अपक्ष आणि बंडखोरांना अधिक भाव असेल असा अंदाज वर्तवला आहे. यावेळी अपक्षांशिवाय कोणतेही सरकार सत्तेत येणार नाही, असा दावा मतदानापूर्वीच वर्तवण्यात येत होता.