yuva MAharashtra सांगली जिल्ह्यात 'मायक्रो प्लॅनिंग'ने भाजपची 'मविआ'ला धोबीपछाड !

सांगली जिल्ह्यात 'मायक्रो प्लॅनिंग'ने भाजपची 'मविआ'ला धोबीपछाड !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ नोव्हेंबर २०२
महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील, विश्‍वजित कदम यांच्यासारख्या दिग्गजांना जिंकताना नाकी नऊ आले. त्यातून जिल्ह्यात महायुतीच्या 'वादळा'ची कल्पना यावी. सांगलीत सुधीर गाडगीळ, मिरजेत सुरेश खाडे यांनी काँग्रेसच्या बंडखोरीचा लाभ घेत निर्विवाद यश मिळवले. शिराळ्यात सत्यजित देशमुख, जतमध्ये गोपीचंद पडळकर यांनी धक्कादायक विजय मिळवत भाजपच्या जिल्ह्यातील विजयावर शिखर चढवले.

खानापूर-आटपाडी मतदारसंघात सुहास बाबर यांनी दिवंगत अनिल बाबर, तर तासगावात रोहित पाटील यांनी आर. आर. पाटील यांचा वारसा कायम ठेवला. लोकसभेला 'बॅकफूट'वर गेलेल्या भाजपने मतदारसंघनिहाय 'मायक्रो प्लॅनिंग' करीत दुरुस्त्या केल्या. जिल्ह्याचा सामना पाच विरुद्ध तीन असा निर्विवाद जिंकला. गतवेळच्या तुलनेत भाजपने शिराळा, जतमध्ये दोन जागांची जादाची कमाई केली. 'खानापूर-आटपाडी'त शिंदे गटाच्या शिवसेनेने बाबर यांना 'आपलेसे' करीत निकालाची पुनरावृत्ती केली.

सहा महिन्यांपूर्वी लोकसभेला सांगली मतदारसंघात तब्बल लाखांचे मताधिक्य घेत विशाल पाटील यांनी काँग्रेससाठी जिल्हाभरात आशादायक चित्र तयार केले. मात्र हे सारे वातावरण काँग्रेसच्या विशाल पाटील आणि विश्‍वजित कदम या तरुण तुर्क नेत्यांना टिकवता आले नाही. व्यक्ती-घराण्याच्या अहंकारात आशादायी वातावरण धुळीस मिळाले. तेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबाबत झाले. जयंत पाटील यांनी कसेबसे मैदान मारले. रोहित पाटील यांनी काट्याच्या लढतीत चांगले यश मिळवले; तर शिराळा मतदारसंघात मानसिंगराव नाईक यांना जोरदार धक्का बसला.


लोकसभेवेळी सांगलीत काँग्रेसला १८, तर मिरजेत २५ हजारांचे मताधिक्य होते. या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी खासदार म्हणून काँग्रेसचे नेतृत्व हाती आलेल्या विशाल पाटील यांच्याकडे या दोन्ही जागांची जबाबदारी होती. सांगलीत जयश्री पाटील यांची बंडखोरी काँग्रेसचा घात करणार, हे प्रारंभापासून स्पष्ट होते; तर मिरजेत खाडेंसमोर तुल्यबळ तयारी केलेले उमेदवार मोहन वनखंडे यांना रिंगणातूनच बाहेर करीत खाडेंचा विजयाचा मार्ग मोकळा केला. अर्थात, यासाठी भाजपने राज्यस्तरावरून केलेले 'मायक्रो प्लॅनिंग' महत्त्वाचे ठरले.

महाविकास आघाडीचे राज्याचे नेतृत्व जयंत पाटील, विश्‍वजित कदम यांच्यासारखे नेते भाजपचा जिल्ह्यातील विजयाचा अश्‍वमेध रोखण्यात अपयशी ठरले. तुलनेत भाजपने लोकसभेतील अपयशातून धडा घेत शिराळा ते जत अशा आठही मतदारसंघांतील गट आणि गटाचे 'मायक्रो प्लॅनिंग' केले.

त्याच वेळी शिराळ्यात सम्राट महाडिक यांना थंड करीत सत्यजित देशमुख यांना उमेदवारी देणे, गोपीचंद पडळकर यांना जतमधून ताकद देताना उमेदवारी बहाल करणे, खानापूरमध्ये सुहास बाबर यांना एकमुखी पुढे चाल देताना विरोधकांत फूट घडवणे, सांगलीत जयश्री पाटील यांची बंडखोरी घडवण्याचे राज्यस्तरीय प्लॅनिंग पूर्ण झाल्यानंतर गाडगीळ यांना पुन्हा रिंगणात उतरवणे, सुरेश खाडे यांच्यासमोरचा तयारी केलेला मल्ल ऐनवेळी रिंगणातूनच 'गायब' करणे, या चाली यशस्वी ठरल्या. त्याचवेळी जयंत पाटील, विश्‍वजित कदम, रोहित पाटील यांना मतदारसंघात अडकवण्याची खेळी यशस्वी केली. या संपूर्ण निवडणुकीत भाजपच्या 'मायक्रो प्लॅनिंग'ला दाद द्यावी लागेल. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना शंभर टक्के गुण द्यायला हवेत.

...असं झालं नियोजन

लोकसभेच्या निवडणुकीवेळी संघ स्वयंसेवक दूर राहिल्याची चर्चा होती. विधानसभेसाठी मात्र संघाची यंत्रणा सक्रिय झाली. मतदान किती गरजेचे आहे, हे पटवतानाच ते मतदान भाजपला कसे होईल आणि हिंदू मतांचे संघटन करण्यासाठी यंत्रणा राबवली. 'बटेंगे तो कटेंगे' हा नारा संघाच्या गोटातूनच पुढे आला. भाजपचे बेळगाव, कर्नाटकातील सुमारे पन्नासवर नगरसेवक-कार्यकर्ते सांगलीत साठ दिवस तळ ठोकून होते. त्यांना प्रत्येकास एक-एक प्रभाग सोपवला होता. भाजपचा मतदार शोधून त्याला घट्ट करण्याचे काम त्यांना सोपवले होते. त्यांच्याकडे भाजपच्या सहानुभूतीदार मतदारांची यादीच होती. गृहभेटीतून या सर्व मतदारांचे पॉकेट कायम ठेवण्यात भाजपला सांगली-मिरजेत यश आले. दुसरीकडे, काँग्रेस महाविकास आघाडीत, तर उमेदवार ठरवण्यापासून घोळ सुरू करण्यात भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांनी यश मिळवले. त्याला आघाडीतील नेत्यांचा हव्यासही तितकाच कारणीभूत होता. निवडणुकीतून माघार घेणारे गाडगीळ पुन्हा सक्रिय होतात किंवा खाडे यांच्यासमोरचा उमेदवारच गायब होणे, हा नक्की योगायोग नव्हता.