| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ नोव्हेंबर २०२४
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी सांगलीत प्रलंबित असलेले विमानतळ लवकरच करु तसेच हळद बोडांची शाखा आणि मोठा प्रकल्प उभारण्याची घोषणा केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सांगलीत झालेल्या जाहीर सभेत बोलताना केली. संविधान आणि आरक्षणाला हात लावण्याची हिंमत कोणामध्येही नाही. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींचे आरक्षण जसेच्या तसे राहील, असा विश्वासही त्यांनी दिला.
सांगली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिडांगणावर भाजप-महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत केंद्रिय गृहमंत्री शहा बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, माजी खासदार संजयकाका पाटील, पृथ्वीराज पवार, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार, जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, मकरंद देशपांडे, अविनाश मोहिते, सुमित कदम उपस्थित होते.
केंद्रिय मंत्री शहा म्हणाले, सांगलीत विमानतळ बनवणार आहोत. सांगलीतून दिल्ली, बेंगलोर, चेन्नई आणि मुंबईला लवकरच विमान प्रवास सुरू होईल. सांगली पुणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण झाले आहे. वंदे मातरम् रेल्वे सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय हळद बोर्डची शाखा सांगलीत सुरू करणार आहोत. सांगलीत लवकरच मोठा प्रकल्प आणणार आहोत. देशात सर्वात परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सत्ताकाळात झाली आहे. मुंबई मेट्रो, घारावी प्रकल्प, बुलेट ट्रेन, कोस्टल रोड, अटल सेतू आदी अनेक महत्वाकांक्षी उपक्रमांना शरद पवार, उध्दव ठाकरे आणि कंपनीमुळे विलंब झाला असे शहा म्हणाले.
राज्यात विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान आहे. २३ नोव्हेंबरला मतमोजणी आहे. यानंतर महायुतीचे सरकार बनेल. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे. असे सांगून अमित शाह पुढे म्हणाले की, कमळ सांगलीमध्ये देखील फुलणार आहे. तुम्ही केवळ सुधीर गाडगीळ यांना मतदान करणार नाहीत तर भारताला मजबूत करणार आहे. सांगलीत गाडगीळ यांना मतदान केले तर ते मत मोदी यांना जाईल. काश्मिरला विशेषाधिकाराचे ३७० वे कलम हटवल्यानंतर राहुल गांधी, शरद पवार, ममता बनर्जी, स्टॅलिन, अखिलेश यादव यांनी काऊ काऊ सुरू केले. जम्मू काश्मिर विधीमंडळात काँग्रेसने ३७० कलम पुन्हा आणण्याचा प्रस्ताव आणला. पण राहुल गांधी यांची चौथी पिढी आली तरी काश्मिरमधून हटवलेले ३७० कलम पुन्हा येणार नाही, असे शहा यांनी ठणकावून सांगितले.
सोनिया मनमोहनसिंह यांच्या सत्ताकाळात दहशतवादी हल्ले वारंवार होत होते. काश्मिरमध्ये बॉम्ब फुटत होते. २०१४ मध्ये मोदी सरकार केंद्रात आले. उरी, पुलवामा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. पण यावेळी देशात मोदी सरकार होते. हल्ल्यानंतर दहा दिवसात पाकिस्थानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खातमा केला. मोंदींनी देशाला सुरक्षा दिली. धर्म आणि संस्कृतीला सन्मान दिला. काँग्रेसने राममंदिरचा प्रश्न ७५ वर्षे लटकवत ठेवला. मात्र मोदी यांनी राममंदिरचा प्रश्न सोडवला. राममंदिर उभारले आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही केली.
सहकाराची मृत्यूघंटा पचार कंपनीने बाजबली
वसंतदादा यांच्या नावाने आशियायी खंडातील सर्वात मोठा कारखाना होता. मात्र तो विकण्याचा घाट शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी घातला. महाराष्ट्रात २०० साखर कारखाने होते. साखर कारखान्याची दुरावस्था शरद पवारांच्या काळात झाली. सहकाराची मृत्यूघंटा वाजविण्यात शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांचा हात असल्याची टीकाही मंत्री शहा यांनी केली. मोदींनी कारखान्यावरील टॅक्स माफ केला. येथे घोटाळे करण्याचे काम काँग्रेसच्या नेत्यांनी केले आहे.
राहुल गांधींच्या सोबत राहून शरद पवारांना खोटे बोलण्याची सवय लागली आहे. ठाकरे आणि पवार यांचे सरकार होते. त्यावेळी सर्वात कमी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. आमचे शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात गुंतवणूक वाढली. महाराष्ट्रातील सर्व प्रोजेक्ट थांबवण्याचे काम शरद पवार आणि कंपनी यांनी केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी खालच्या स्थरावर जाऊ नका, त्यांना आता मुख्यमंत्री सुद्धा कोणी बनवणार नाहीत. छत्रपती संभाजी नगर महान बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतांना सत्ता प्राप्त करण्यासाठी सरेंडर केले आहे.
७० वर्षांपुढील वृद्धांना पाच लाख रुपये योजनेतून उपचारासाठी मिळणार आहेत. ३६ हजार घर सांगलीत आम्ही दिले आहेत. अजून ४० हजार घरे आम्ही देणार आहे. पाच लाख लोकांना ५ किलो धान्य आम्ही देत आहोत. महायुतीच्या सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यात सिंचन योजनेचे जाळे पसरवून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात आम्ही पाणी पोहोचवणार असल्याचेही केंद्रिय गृहमंत्री शहा यांनी सांगितले.
वक्फ बोर्ड कायद्यास पवार आणि कंपनीचा विरोध असल्याचे सांगून शहा म्हणाले, शेतकरी, मंदिर, शाळा, कॉलेजची जमीन वक्फ बोर्डची होईल. त्यामुळे वक्फ बोर्ड कायदा बदलण्याची गरज आहे. परंतु शरद पवार आणि कंपनीचा वक्फ बोर्ड कायदा बदलण्यास विरोध आहे. कर्नाटकमध्ये गावेच्या गावे, शेतकरी, मंदिर, शाळा, कॉलेजची जमिन वक्फ बोर्डाची झाली आहेत. वक्फ बोर्ड कायदा मोदी सरकारच बदलेल. प्रत्येक शेतकऱ्याला केंद्रातून सहा हजार आणि राज्यातून सहा हजार असे १२ हजार मिळत आहेत. तुम्ही पुन्हा युतीचे सरकार बनवा या १२ हजाराला आम्ही १५ हजार करण्याचे काम करू, असे आश्वासन यावेळी बोलताना अमित शाह यांनी दिले.
स्वागत करताना आमदार सुधीर गाडगीळ यांनी मागील दहा वर्षात विकासकामे केली आहेत, अद्यापही काही कामे प्रलंबित आहेत. उर्वरित कामे पूर्ण करुन मतदारससंघ मागणीमुक्त करण्यासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन केले. या सभेला शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, अजितदादा गटाचे जिल्हाप्रमुख पद्माकर जगदाळे, जनसुराज्यचे समित कदम, शेखर इनामदार, नीता केळकर, अॅड स्वाती शिंदे, धीरज सूर्यवंशी, प्रकाश बिरजे, स्वाती शिंदे, गितांजली ढोपे-पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व मतदार सहभागी होते.
गणरायाला बंदन अन् वसंतदादा, राजारामबापुंचे स्मरण केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात सांगलीचे आराध्य दैवत गणराज यांना वंदनाने केली. त्यानंतर स्वराज्याचे संस्कार देणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यासह सर्व महापुरुषांचे स्मरण करीत भाषणाची सुरुवात केली.