yuva MAharashtra शरद पवारांचा आर आर पाटलांच्या लेकाला फोन, तुम्ही कुणी बोलू नका, मी बघतो !

शरद पवारांचा आर आर पाटलांच्या लेकाला फोन, तुम्ही कुणी बोलू नका, मी बघतो !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ नोव्हेंबर २०२
आर आर पाटील यांनी कथित सिंचन घोटाळ्याप्रकरणी माझी खुली चौकशी व्हावी म्हणून फाईलवर सही केली, हा केसाने गळा कापण्याचा प्रकार होता, असे धक्कादायक विधान अजित पवार यांनी आर आर यांच्या निधनानंतर जवळपास ९ वर्षांनी केल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांना धक्का बसला. आर आर पाटील यांच्या कुटुंबियांना देखील धक्का बसल्याने त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी सांगितले. या सगळ्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आर आर यांच्या कुटुंबियांना संपर्क करून माफी मागितली.

तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ अजित पवार आले होते. त्यावेळी आर आर पाटील यांच्यावर टीका करताना अजित पवार यांना कथित सिंचन घोटाळ्याची फाईल आठवली. "आर आर यांनीच त्या फाईलवर सही केली होती. त्यांच्या राजकीय जीवनात एवढे सहकार्य करूनही त्यांनी माझा केसाने गळा कापला", असे विधान अजित पवार यांनी केले. तासगावमध्ये येऊन आर आर यांच्यावर विधान केल्याने अजित पवार यांच्या मूळ हेतूविषयी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.


ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कदम यांनी आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची विधानसभेच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या मुलाखतीत याच अनुषंगाने प्रश्न विचारला. त्यावर रोहित पाटील म्हणाले, अजित पवार यांच्या विधानानंतर आबा कुटुंबियांना अतिशय वाईट वाटले. जसे आम्हाला वाईट वाटले तसे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनाही वाईट वाटले. सुप्रिया सुळे आणि शरद पवार या दोघांनीही आम्हाला दूरध्वनीवरून संपर्क केला.

अजितदादांच्या वक्तव्यासाठी मी माफी मागते. आर आर यांनी पक्षासाठी जे कष्ट घेतले ते एका वक्तव्याने वाया गेले असं आम्हांला वाटत, असे मला सुप्रियाताई सुळे म्हणाल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले. अजितदादांच्या वक्तव्यासाठी आर. आर आबांच्या कुटुंबियांची माफी मागून सुप्रियाताईंनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवून दिल्याचेही रोहित पाटील म्हणाले.

तसेच शरद पवार यांनीही दादांच्या विधानावर खेद व्यक्त केला. आबा कुटुंबियांनी अजितदादांच्या विधानावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये. पुढे काय करायचं ते मी बघतो... असे शरद पवार म्हणाल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले.